खा. सुनील तटकरे यांची उच्चस्तरीय बैठकीत ग्वाही, रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
खेड(प्रतिनिधी)रायगड लोकसभा क्षेत्रातील रेल्वे समस्या सोडवण्याच्या दृष्टीने खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करत ज्या ज्या गोष्टी शक्य असतील त्या रेल्वे बोर्डासह केंद्रीय मंत्रालयाकडे मांडण्याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आश्वस्त केल्यानंतर रेल्वेमंत्रालयात पाठपुरावा करण्याची ग्वाही खासदार तटकरे यांनी दिली.
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण, रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत पूर्ववत करणे, मुंबई- चिपळूण नवीन गाडी सुरू करणे, पुणे – एर्नाकुलम एक्सप्रेस कल्याणमार्गे वळवणे, जबलपूर – कोईमतूर एक्सप्रेसला कल्याण स्थानकात थांबा देणे, गोव्यातून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये कोकण रेल्वेने रत्नागिरीच्या उत्तरेकडील स्थानकांना दिलेला अपुरा कोटा वाढवणे किंवा सर्व स्थानकांना समान कोटा देणे आदी महत्त्वाचे विषय मांडण्यात आले.
पेण, नागोठणे, रोहा, माणगाव आणि वीर येथील रेल्वे समस्यांबाबतही चर्चा करण्यात आली. प्रवासी संघटनांसह जल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव, अखंड कोकण रेल्वे प्रवाशी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनीही रेल्वेप्रश्नी समस्या मांडत न्याय मिळवून देण्यासाठी आग्रह धरला.
याप्रसंगी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मिना, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा, अजय बिरवटकर यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.








