शिवसेनेचे धनुष्यबाण ना. एकनाथ शिंदे यांनी लिलया पेलले-माजी आ. सदानंद चव्हाण

महाराष्ट्रातून शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इन्कमिंग
ना. शिंदेंच्या १५ रोजीच्या रत्नागिरी दौऱ्यात पदाधिकारी- कार्यकर्त्यांचा शिवसेनेत होणार प्रवेश

चिपळूण (प्रतिनिधी):– शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अल्पावधीतच शिवसेनेचे धनुष्यबाण लिलया पेलले आहे. विशेष म्हणजे लोकसभा- विधानसभा निवडणुकीमध्ये आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्हा देखील मागे राहिलेला दिसत नाही. येत्या १५ रोजी ना. एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात चिपळूण मधील अन्य पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी शहरातील बहादूरशेख नाका येथील पुष्कर कॉम्प्लेक्सच्या स्वामी मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाप्रसंगी दिली. यामुळे चिपळूण मधील ते पदाधिकारी व कार्यकर्ते कोण असणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस चिपळूण शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी सुरुवातीला शहरवासीयांसह पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेल्या नारायण तलाव येथे वॉटर कुलरचा लोकार्पण सोहळा शिवसेना उपनेते माजी आ. सदानंद चव्हाण यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. रश्मी गोखले, तालुकाप्रमुख संदेश आयरे शहर प्रमुख उमेश सकपाळ, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष महंमद फकीर, युवा सेना तालुका प्रमुख निहार कोवळे, शहर प्रमुख विनोद पिल्ले, सौ प्राजक्ता टकले, माजी नगरसेविका सौ. स्वाती दांडेकर, सुनील गोरीवले, प्रकाश पाथरूड, सचिन शेटे, अमित खातू, विकी लवेकर, अंकुश आवले, कपिल शिर्के, सौ. राणी महाडिक, सौ. प्रिया शिंदे, सौ. वंदना महाडिक, सौ. आरती महाडिक, सौ. तृप्ती कदम, सौ. सुवर्णा साडवीलकर, चिपळूण नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर आदी उपस्थित होते.

नंतर चिपळूण बहादूर शेखनाका येथील पुष्कर कॉम्प्लेक्सच्या स्वामी मंगल कार्यालयात रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी उपशहर प्रमुख कपिल शिर्के, सचिन शेटे आदींनी रक्तदान केले. या सर्वांना शिवसेना उपनेते माजी आ. श्री. चव्हाण यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आपल्या मनोगतात शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या राजकीय वाटचालीचे कौतुक करताना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना शिवसेना पक्षाबद्दल जनतेमध्ये चांगले जन्म तयार झाले आहे. यामुळे शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. येत्या १५ रोजी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून रत्नागिरी येथील चंपक मैदानात आभार मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी चिपळूणमधील मोठ्या संख्येने शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले.

तर या मेळाव्यात रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होणार आहे. यामध्ये चिपळूणमधील देखील काहींचा समावेश असणार आहे. या सर्वांना आपण सोबत घेऊन आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष संघटन मजबूत करण्याच्यासाठी आपण सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन केले. यावेळी तालुकाप्रमुख संदेश आयरे व युवासेना तालुकाप्रमुख निहार कोवळे यांनी आपली मनोगते मांडली.

शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्यातर्फे संस्थाना भेटवस्तू

शिवसेना चिपळूण शहर प्रमुख उमेश सकपाळ यांच्यातर्फे गरजूंना वेळोवेळी मदतीचा हात दिला जातो. अपघात असो, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असो, तिथे उमेश सकपाळ धावून जात असतात. याच अनुषंगाने शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय समाजसेवा केंद्र मार्कंडी, चिपळूण व आरती निराधार संस्था चिपळूण या दोन्ही संस्थांना भेटवस्तू प्रदान करून सामाजिक दायित्व सिद्ध केले आहे. याबद्दल या दोन्ही संस्थांनी उमेश सकपाळ यांना धन्यवाद दिले आहेत. एकंदरीत ना. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला.