संत सेवालाल महाराज जयंती उत्साह साजरी  

लांजा रेस्ट हाऊस ते बंजारा समाज मंदिरापर्यंत काढण्यात आली रॅली

लांजा( प्रतिनिधी) बंजारा समाजाचे थोर संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती शनिवारी १५ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने सकाळी ११.३० वाजता लांजा रेस्ट हाऊस ते बंजारा समाज मंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली.

बंजारा समाज संघाच्यावतीने संत सेवालाल महाराज यांची जयंती शनिवारी उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला लांजा रेस्ट हाऊस या ठिकाणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आशपाक हाजू यांचे हस्ते श्रीफळ वाढवून आणि संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी लांजा नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष सुनील कुरूप, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, भाजपाचे नगरसेवक संजय यादव, शिवसेना शहरप्रमुख सचिन डोंगरकर, राजू धावणे हे मान्यवर उपस्थित होते.

यानंतर ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि संत सेवालाल महाराजांचा नामाचा जयघोष करत लांजा रेस्ट हाऊस ते बाजारपेठेतून संत सेवालाल यांची रॅली ही बंजारा समाज मंदिरापर्यंत काढण्यात आली.

या रॅलीमध्ये बंजारा समाज सेवा संघ लांजाचे सर्व पदाधिकारी व बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.