नाणीजला यागाने गजानन महाराज प्रकट दिन सोहळा सुरू

भाविकांचे लोंढे सुंदरगडावर दाखल

नाणीज – श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे संतशिरोमणी गजानन महाराज यांचा प्रकट दिन व आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य यांचा जयंती सोहळा आजपासून उत्साहात सुरू झाला. सकाळी महामृत्यूंजय सप्तचिरंजीव यागाने त्याची सुरूवात झाली. त्यानंतर देवदेवतांना निमंत्रण देणा-या मिरवणुका ढोल-ताशांच्या गजरात व जयजयकारात काढण्यात आल्या. उद्या सोहळ्याचा मुख्य दिवस आहे. दरम्यान भाविकांचे अक्षरशः लोंढे सुंदरगडावर दाखल होऊ लागले आहेत.
आज सकाळी महामृत्यूजय सप्तचिरंजीव यागाने सोहळा सुरू झाला. वे.शा.सं.भालचंद्र शास्त्री शौचे गुरूजी यांनी मंत्रोच्चार करीत विधिवत हा सोहळा सुरू केला. त्यामुळे सारा सुंदरगडाचे वातारवण बदलून गेले. मंगलमय झाले. याचवेळी अन्नदान विधीही झाला. संपूर्ण सोहळ्याला जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज व प.पू. कानिफनाथ महाराज यांची उपस्थिती भक्तांसाठी जिव्हाळ्याचा विषय होती.

सकाळी ११ नंतर देवांना निमंत्रण देणा-या मिरवणुका सुरू झाल्या सुंदरगडावरील संतशिरोमणी गजानन महाराज मंदिरापासून ते प्रभू रामचंद्र मंदिर आणि वरद चिंतामणी मंदिर अशा दोन स्वतंत्र मिरवणुका काढण्यात आल्या. दुपारी बारा वाजता नाथांचे माहेर ते वरद चिंतामणी मंदिर ते प्रभू रामचंद्र मंदिर ते संतशिरोमणी गजानन महाराज मंदिर अशी तिसरी मिरवणूक निघाली. सर्व मिरवणुकांत भक्तांचा उत्साह प्रचंड होता. ढोल, ताशे वाजवत, नाचत, जल्लोश व जयघोष करीत या मिरवणुका निघाल्या. नाथांचे माहेर येथे दुपारपासून नामगरज सुरू झाला. सुंदरगडावर रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगत आणली.

उद्या गुरुवार हा सोहळ्याचा मुख्य दिवस आहे. यादिवशी सकाळी ९ वाजता नाथांचे माहेर येथून शोभायात्रा सुरू होईल. लोककला, त्या त्या भागातील वाद्ये, लोकनृत्ये, सजिव देखावे, चित्ररथ. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज, प.पू. कानिफनाथ महाराज यांचा रथ, देशभरातील विविध आखाड्यांचे साधूसंत यांचा स्वतंत्र रथ या यात्रेची शोभा वाढवणार आहेत. त्यानंतर राजकारणात आपल्या कार्याचा ठसा उमटवणा-या नेत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. उत्कृष्ट पथकांचा व रक्तदान शिबिर काळात उत्तम कामगिरी केलेल्यांचे सत्कार होणार आहेत. रात्री प.पू. कानिफनाथ महाराज यांचे हिंदीतून प्रवचन होईल. त्यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन होऊन देवाला साकडे घालून सोहळ्याची सांगता होईल. या सोहळ्या राज्यभरातून तसेच गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटका, छत्तीसगडहून भक्त आले आहेत.