मालवण | प्रतिनिधी : मालवण येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा हीरक महोत्सव समारोप सोहळा शनिवार २६ एप्रिल रोजी होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार दीपक केसरकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष दीपक परब, संस्थाध्यक्ष डॉ. किरण ठाकूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य शिवराम ठाकुर यांनी दिली.
स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाविषयी माहिती देण्यासाठी कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी संघटना यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव चंद्रशेखर कुशे, भाऊ सामंत, विजय, केनवडेकर, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुधीर धुरी, संदेश कोयंडे, प्रदीप नाईक-साटम आदी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी कार्यक्रमांची रुपरेषा स्पष्ट केली. या कार्यक्रमासाठी स्वागत समिती गठीत करण्यात आली असून समितीत कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे विश्वस्त, मालवणातील प्रतिष्ठित नागरिक, माजी विद्यार्थी, प्राचार्य, आजी-माजी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश आहे. या नियोजनासाठी कोअर कमिटी नेमण्यात आली आहे. त्यातही सर्व घटकांच्या प्रतिनिधींचा समावेश केला आहे. सकाळी ९ वाजता कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर यांच्या हस्ते फन फेअरचे उद्घाटन, १० वाजता खासदार नारायण राणे यांच्या हस्ते बास्केटबॉल मैदानाचे उद्घाटन होईल. नंतर मुख्य कार्यक्रमास सुरुवात होऊन त्यामध्ये मान्यवरांसह प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी, कॉलेजचे आजपर्यंतचे जनरल सेक्रेटरी, विद्यापीठ प्रतिनिधी, विद्यार्थिनीं प्रतिनिधी, गेल्या दहा वर्षात निवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार होणार असल्याचे प्राचार्य ठाकुर यांनी सांगितले.
माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष सुधीर धुरी यांनी दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा स्पष्ट केली. दुपारी ३ वाजता माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन, माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा, मनोगते, चित्रफिती दाखविण्यात येणार आहेत. माजी विद्यार्थ्यांतर्फे मान्यवरांचे सत्कार व सन्मान तसेच माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी संघटनेकडून निधी गोळा करण्यात येत असून कमीत कमी खर्च कार्यक्रमावर करून उर्वरित निधी कॉलेजच्या शैक्षणिक उपक्रमासाठी खर्च करण्यात येईल,असे धुरी यांनी सांगितले.
यावेळी मंडळाचे सचिव चंद्रशेखर कुशे म्हणाले, काळ बदलत असून स्पर्धेचे व डिजिटलायझेशनचे युग असल्याने महाविद्यालयाची प्रगती होण्यासाठी काही प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. यात आधुनिक डिजिटल शिक्षण सुविधेसाठी इंटरेक्टिव्ह डिजिटल बोईस, स्मार्ट क्लासरुम्स, पर्यावरणपूरक आणि स्वयंपूर्ण उर्जा प्रणालीसाठी सौरऊर्जा प्रकल्प, विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी खेळाचे मैदान व क्रीडा सुविधा, नाविन्यपूर्ण संशोधनाला चालना देण्यासाठी संशोधन व प्रयोगशाळा सुधारणा, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी अत्याधुनिक कॉम्प्युटर लॅब या प्रकल्पांच्या पूर्ततेकरिता निधी संकलनासाठी आम्ही आवाहन करीत आहोत. यासाठी स्वतंत्र निधी संकलन समिती स्थापन केली आहे. सर्व आजी-माजी विद्यार्थी, पालक, हितचिंतक, दानशूर व्यक्ती, संस्था पदाधिकारी, निवृत्त कर्मचारी यांनी अधिकाधिक निधी संकलन करावा, असे आवाहन कुशे यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या महोत्सवास उपस्थित राहवे, असे आवाहन केले.












