देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला संरक्षण मंत्रालय अंतर्गत असलेल्या सैनिक स्कुल सोसायटी कडून न्यू इंग्लिश स्कुल प्रशालेला संलग्न सैनिकी शाळा सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.
केंद्र सरकारने सुमारे पाच वर्षांपूर्वी देशभरात 100 शाळा काढण्याची योजना बनविली होती. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाने राष्ट्राहिताच्या विचारांनी त्याकरता लगेच प्रस्ताव दिला होता. यानंतर तीन वेळा संरक्षण मंत्रालयाकडून संस्थेची तपासणी करण्यात आली, आणि यासंबंधी रीतसर परवानगी आज दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी प्राप्त झाली अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री सदानंद भागवत यांनी दिली.
सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नाने संस्थेच्या शिरपेचात हा आणखी एक तूरा खोचला गेला आहे. सैनिकी शाळेच्या माध्यमातून समाज घडवण्याची आणखी एक संधी आणि जबाबदारी आपल्या संस्थेला मिळाली आहे याचा खूप आनंद होतो अशी भावना व्यक्त करत या शाळेच्या प्रत्येक तपासणीच्या वेळी संस्था पदाधिकाऱ्यांच्या बरोबर न्यू इंग्लिश स्कूल देवरुख प्रशालेच्या मुख्याध्यापक आणि स्टाफने खूप कष्ट घेतले होते अशी माहिती श्री भागवत यांनी दिली. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री आदरणीय श्रीपादजी नाईक साहेब यांचे माध्यमातून श्री. भागवत यांनी संरक्षण मंत्री आदरणीय राजनाथ सिंग साहेब यांची यासाठी दिल्लीमध्ये भेट घेतली होती.
चारशे मीटर रनिंग ट्रॅक, खेळाची मैदाने, इंडोअर क्रीडा सुविधा, बास्केटबॉल कोर्ट, शहीद जवान स्मारक या गोष्टींबरोबरच सैनिक स्कूल ला परवानगी मिळाल्यामुळे संस्थेकडून होणाऱ्या राष्ट्रसेवेचे एक प्रकारे छोटेसे वर्तुळ पूर्ण झाले आहे अशी भावना श्री भागवत यांनी व्यक्त केली.












