स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाची
सावंतवाडी : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अवघ्या काही दिवसातच सोनसाखळी चोरीचा एक गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे. अलिकडेच २७ एप्रिल रोजी सायंकाळी मळगाव येथे घडलेल्या या गुन्ह्यात अज्ञात चोरट्याने मुरलीधर विठ्ठल गवंडे या व्यक्तीच्या गळ्यातील १ तोळ्याची सोन्याची चैन चोरून नेली होती. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ८८/२०२५ भा.द.वि. कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी समांतर तपास सुरू केला होता. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी वासुदेव उर्फ दिपराज दामोदर मूलवी (वय ३८ वर्षे, रा. गावणे बडोदा, ता. फोंडा, दक्षिण गोवा) याला निष्पन्न केले. आरोपी हा सतत आपले ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना त्याच्यावर पाळत ठेवणे आवश्यक होते. तब्बल चार दिवस सतत लक्ष ठेवल्यानंतर, पोलिसांनी शनिवार ३ मे रोजी सायंकाळी ६.४५ वाजता फार्मगुडी, गोवा येथून वासुदेवला ताब्यात घेतले.
पोलिसांनी कसून चौकशी केली असता, संशयित वासुदेवने गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेली सोन्याची चैन त्याने कुठे लपवली आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपीला पुढील तपासासाठी सावंतवाडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक समीर भोसले, पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे, हेड कॉन्स्टेबल प्रकाश कदम, हेड कॉन्स्टेबल अनुप खंडे, पोलीस नाईक चांद्रकांत पालकर, पोलीस कॉन्स्टेबल जयेश सरमळकर यांच्या पथकाने केली आहे.











