वहाळाला आलेल्या पुराचे पाणी शिरले थेट नागरिकांच्या घरात 

लांजा शहरातील श्रीरामपूल येथील घटना 

 संतोष कोत्रे l         लांजा -; मुंबई गोवा महामार्ग ठेकेदार कंपनी आणि अधिकारी वर्ग यांच्या बेजबाबदार कारभारामुळे लांजा शहरातील वहाळाला आलेल्या पुराचे पाणी हे थेट येथील नागरिकांच्या घरात शिरले आहे .लांजा श्रीरामपल येथे ही घटना घडली आहे .त्यामुळे महामार्ग ठेकेदार कंपनीच्या संथपणे सुरू असलेल्या कामांचा हा नमुनाच पुढे आला आहे.

मुंबई गोवा महामार्गाची लांजा शहरात आधीच बिकट अवस्था आहे. ठिकठिकाणी महामार्गावर पडलेले खड्डे आणि मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले चिखलाचे साम्राज्य यातून नागरिकांना, प्रादचाऱ्यांना चालत जाणे एक प्रकारचे दिव्यच आहे .तर चिखल आणि खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे देखील मोठे हाल होत आहेत. पावसाला सुरुवात झाल्यानंतर नागरिक आणि वाहन चालक यांची या महामार्गामुळे अतिशय बिकट वसलेले आहे. साटवली फाटा ते बसस्थानकात दरम्यान रोजच ट्रॅफिक जॅम ची समस्या आहे.

. लांजा शहरात श्रीराम पुलाचे काम मे महिन्यात हाती घेण्यात आले होते. सुरुवातीपासूनच हे काम धीम्या गतीने सुरू झाले .वास्तविक हे काम पावसाळ्यापूर्वीच किंवा मे महिन्या अगोदरच पूर्ण करणे गरजेचे होते .कारण मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी हा एकमेव आणि महत्त्वाचा पुल आहे .मात्र याचे काम धीम्या गतीने आणि उशिरा सुरू केला गेल्याने याचा फटका सध्या बसत आहे .या ठिकाणी वाहनांसाठी तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या ठिकाणी वहाळाचे पाणी वाहून जाण्यासाठी एकच मोरी टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे या वहाळाला आलेल्या प्रचंड पुराचे पाणी जाण्यासाठी एक मोरी अपुरी पडत असल्याने पुराचे पाणी या ठिकाणी असणाऱ्या नेवरेकर यांच्या घर परिसरात शिरत आहे. पुराच्या पाण्याचा फटका हा रोजच त्यांना सहन करावा लागत आहे .

महामार्ग ठेकेदार कंपनी आणि अधिकारी वर्ग यांच्या चालढकल आणि बेजबाबदार धोरणामुळेच लांजातील नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत असून जर वेळीच पुलाचे, सर्व्हिस रोडचे काम

पूर्ण झाले असते तर आजची ही परिस्थिती निर्माण झाली नसती अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.