
रत्नागिरी : पर्यावरण संवर्धनाच्या वचनबद्धतेला प्रत्यक्षात उतरवित भारतीय तटरक्षक दलाने रत्नागिरी येथे 02 जून 23 रोजी सकाळी रत्नागिरी शहराच्या हद्दीत 10 किमी सायकल रॅलीचे उत्साहात आयोजन केले. या कार्यक्रमात तटरक्षक अवस्थान रत्नागिरी, तटरक्षक वायु अवस्थान रत्नागिरी आणि एनसीसी युनिट यांच्या एकूण 30 सायकलस्वारांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे समादेशक (क श्रे) दिनेश टामटा यांनी आपल्या कार्यालयाच्या प्रांगणातून हिरवा झेंडा दाखवून केली. सायकल रॅलीचा उद्देश स्वच्छ, हरित आणि प्रदूषणमुक्त पर्यावरणाबाबत जनजागृती करणे हा होता. या रॅलीचा मार्ग मारुती मंदिर, जेके फाइल्स, एमआयडीसी परिसर यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणावरून परत तटरक्षक कार्यालय असा होता. रॅलीदरम्यान प्रदूषणाचे हानिकारक परिणाम आणि पर्यावरणपूरक पद्धती अवलंबण्याचे फायदे याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी बॅनर आणि फलक प्रदर्शित करण्यात आले.












