खेड (प्रतिनिधी)गांजा विक्री प्रकरणी येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तिघांना गजाआड केले असले तरी अद्याप मुख्य सूत्रधाराचा सुगावा लागलेला नाही. गांजा खरेदीचे ‘ओडिसा कनेक्शन’ उघड झाले असून मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्यानंतरच अन्य सहभागी संशयितांची नावे समोर येणार आहेत.
२ किलो गांजा वाहतूक प्रकरणी पोलिसांनी कमलेश विचारे (२०, रा. नालासोपारा, सध्या शिवतर-दत्तवाडी, खेड), रवींद्र प्रेमचंद खेरालिया (उत्तरप्रदेश), कमलेश सदाशिव जंगम (२१, नालासोपारा-पालघर) यांना गजाआड केले होते. तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गांज प्रकरणात रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने पोलीस निरीक्षक नितीन भोयर साऱ्या शक्यतांचा पडताळाही करत आहेत. मुख्य सूत्रधार असलेला संशयित ओडिसा येथीलच रहिवासी असल्याचे समोर आले आहे. हाच मुख्य सूत्रधार संशयितांना गांजाचा पुरवठा करत होता.












