देवरूख येथे १५ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन

देवरूख (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे ३६ वे एक दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन कोकण विभागात प्रथमच दि. १५ जून रोजी सकाळी ११ वाजता देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे.

या अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभागमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते होणार आहे.

 

यावेळी शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवरूख येथे संपन्न होणार आहे. शिक्षण संस्थांचे संघटन मजबूत करण्यासाठी शिक्षण संस्थांच्या कार्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी तसेच त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून, शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांना सोबत घेऊन शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी हे अधिवेशन मैलाचा दगड ठरेल, महामंडळाच्या मागील सर्व अधिवेशनातून शैक्षणिक व विधायक कामाची श्रृंखला निर्माण होत गेली.

 

ती श्रृंखला मजबूत करण्यासाठी या अधिवेशनाची भुमिका महत्वाची ठरणार आहे. अधिवेशनात संच मान्यता, कर्मचारी भरती, वेतनेतर अनुदान, टप्पा अनुदान, महाविद्यालय अनुदान, इयत्ता अकरावी आँनलाईन प्रवेश पध्दत आदी महत्वाच्या विषयांवर चर्चा व ठराव करून शासनाला सादर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मराठी भाषा संवर्धन व प्रसार या विषयावरही चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती अधिवेशनाचे संयोजक व देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी दिली.