साटेली भेडशी केंद्रशाळा ‘ रोल मॉडेल ‘ ठरेल 

गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ यांनी व्यक्त केला विश्वास

दोडामार्ग:सुहास देसाई : साटेली भेडशी केंद्रशाळेची देदीप्यमान वाटचाल पाहता भविष्यात ही शाळा नक्कीच रोल मॉडेल ठरेल,असा विश्वास दोडामार्ग गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ यांनी व्यक्त केला.

पहिलीत प्रवेश घेतलेल्या नवागतांचे स्वागत आणि शाळा प्रवेशोत्सव आज शाळेच्या पहिल्या दिवशी झाला.यावेळी श्री.नदाफ बोलत होते.

या शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवले जातात.मुख्याध्यापक पूनम पालव खूप सुंदररित्या नियोजन करतात.त्यांना सर्व शिक्षक सहकार्य करतात.पालक,केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व पदाधिकारी शाळेची गुणवत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करतात.यामुळेच या शाळेतील पहिल्या दुसरीच्या मुलांचा शैक्षणिक पाया मजबूत होत आहे.या शाळेत सातवीपर्यंत शिकणारी मुले कुठेही गेली तरी कमी पडत नाही.ती आपला शैक्षणिक दर्जाचा ठसा कायम ठेवतात,असे सांगून श्री.नदाफ यांनी या शाळेत संगणक प्रयोगशाळा असल्याने ६ वी व ७ वी इयत्तेतील मुलांसाठी एमएससीआयटी अभ्यासक्रम यावर्षीपासून सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला.यामुळे भविष्यात ही मुले इंग्रजी माध्यमांच्या मुलांपेक्षा सरस ठरतील, असा विश्वासही व्यक्त केला.

यावेळी त्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना एपीजे अब्दुल कलाम,शिष्यवृत्ती, नवोदय अशा स्पर्धा परीक्षांमध्ये मुलांना बसवून गुणवत्ता यादीत आणावे,अशी अपेक्षा व्यक्त केली.या मुलांचे अभिनंदन करण्यासाठी मी येईन असेही ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर सरपंच छाया धर्णे, विस्तार अधिकारी श्री. तायडे,केंद्रप्रमुख सूर्यकांत नाईक,मुख्याध्यापक पूनम पालव, निवृत्त मुख्याध्यापक अभिमन्यू नाईक,शिक्षणप्रेमी वैभव सुतार आदी उपस्थित होते,

पदवीधर शिक्षक दीपक दळवी,संपदा दळवी,मिलन पाटील,सीमा नाईक, नूतन शिंदे यांनी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.पालक तुळशीदास पारधी,श्रीमती ओतारी,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य नेहा ठाकूर,अंगणवाडी सेविका,मदतनीस या कार्यक्रमाला उपस्थित होते.

सरपंच छाया धर्णे यांनी मराठी विषयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी बक्षीस देण्याची घोषणा केली.केंद्रप्रमुख नाईक यांनी विद्यार्थ्यांनी विज्ञान व संगणक प्रयोगशाळेचा लाभ घ्यावा,सर्व उपक्रमांत सहभाग घ्यावा, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

यावेळी वह्या,बूट आणि गणवेशाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.उन्हाळी सुटीत विविध ऑनलाइन उपक्रम राबवले होते.त्यात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. नवागतांचे स्वागत औक्षण करून आणि त्यांच्या पाऊलखुणांचे ठसे घेऊन करण्यात आले.

सूत्रसंचालन,प्रास्ताविक आणि आभार दीपक दळवी यांनी मानले.

साटेली भेडशी: केंद्रशाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम दिमाखात पारंपरिक पद्धतीने झाला.