Graduation ceremony held at Finolex Academy
फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी येथे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये अभियांत्रिकी पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लांजा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. कुलकर्णी म्हणाले की पदवी हा आपल्या जीवनातला एक महत्वाचा टप्पा आहे पण तो शेवट नाही तर एका नवीन ध्येयाची सुरुवात आहे. आपल्या जीवनात अधिकाधिक ज्ञान संपादन करत रहा. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि ही बॅच महाविद्यालयाला आत्तापर्यंतचा सर्वाधिक निकाल मिळवणारी आणि सर्वाधिक प्लेसमेंट मिळालेली बॅच आहे असे सां गितले. कोव्हीडसारख्या कठीण परिस्थितीतही प्रयत्नपूर्वक यश संपादन केल्याबद्दल प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन, केमिकल, इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी आणि एम.सी.ए. अशा विविध अभियांत्रिकी शाखांच्या सुमारे १५० हून अधिक पदवीधर विद्यार्थ्यांना यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉ. अरविंद कुलकर्णी ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांच्यासह डीन अॅकॅडमिक्स डॉ. मिलिंद यादव, डीन फॅकल्टी डॉ. संजय कुलकर्णी आणि डीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट डॉ. संदीप चावडा उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दर्शना बापट यांनी केले. तर आभारप्रदर्शन डॉ. संजय कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. प्रल्हाद सोमण, श्री. प्रसन्न साठे आणि सहकारी प्राध्यापकांनी प्रयत्न केले.










