देवरूख (प्रतिनिधी)देवरूख जिल्हा परिषद आदर्श शाळा क्रमांक ३ मध्ये सोमवारी नवागत विद्यार्थ्यांचे ढोल ताशांचा गजरात, पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले. औक्षण करून खाऊ व पाठ्यपुस्तके यांचे वाटप करण्यात आले. नवागतांच्या पाउलांचे ठसे देखील घेण्यात आले. या कार्यक्रमाला संगमेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पहिलीमध्ये तब्बल ४५ विद्यार्थी दाखल झाले आहेत.

शाळा परिसरातून ढोल ताशांचा गजर करत मिरवणुक काढण्यात आली. प्रवेशद्वार ते शाळेपर्यंत नवागतांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर शाळेच्या सभागृहात कार्यक्रम पार पडला. दीपप्रज्वलन करून विद्येची देवता सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यार्थ्यांना मोफत पाठपुस्तके, खाऊचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा देखील यथोचित सत्कार करण्यात आला. पहिलीच्या वर्गात दाखल झालेल्या नवागतांच्या पाउलांचे ठसे घेण्यात आले.
याप्रसंगी गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे मुख्याध्यापिका कृतिका सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप कांबळे, उपाध्यक्ष सुरेश करंडे, शिक्षण तज्ज्ञ दिलीप बोथले, शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी आनंद शिवगण, स्टेट बँकेचे अधिकारी निखील भागवत, माता पालक संघाच्या अध्यक्षा दुर्वा मोघे, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक, शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना देवरूख नं. ३ शाळा तालुक्यात नावाजलेली आहे. शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर आहे. मेहनत घेणारा शिक्षक वर्ग आहे. शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, विद्यार्थी यांचा संगम याठीकाणी पहायला मिळत असल्याचे नमुद केले. पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. शाळेसाठी सर्वोतोपरी सहकार्य राहील असे आवर्जून नमुद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार शिक्षिका उज्ज्वला मांडवकर यांनी मानले. पाहिलीमध्ये पाटगाव, पूर, किरदाडी, निवेखुर्द, कर्ली, वाशी आदी गावातून विद्यार्थी दाखल झाले आहेत. पहिल्याच दिवशी पालक प्रशांत विचारे यांनी शाळेला पंखा भेट दिला.













