सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी तब्बल १४ लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात आला आहे. यामुळे रुग्णालयातील स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीच्या कामाला गती मिळाली असून, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील जुन्या ब्रिटिशकालीन इमारतीमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली होती. त्याचबरोबर, रुग्णालयाच्या नवीन इमारतीमधील स्वच्छतागृहांचीही दुरुस्ती आवश्यक होती. यासाठी प्रत्येकी सात लाख रुपये असे एकूण १४ लाख रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील आणि उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदाजित खर्चासह जिल्हा नियोजन अधिकारी श्री. बुधावले यांच्याकडे केली होती.
पालकमंत्री नितेश राणे यांनी या निधीला तातडीने मंजुरी दिली असून, कामाला लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांना हे काम त्वरित हाती घेण्याचे आदेश दिले, ज्यामुळे निधी मंजूर होऊन कामाला तात्काळ सुरुवात झाली आहे.
या स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीमुळे रुग्णालयात येणाऱ्या आंतररुग्ण आणि बाह्यरुग्णांना मोठा फायदा होणार आहे. याव्यतिरिक्त, रुग्णालयात गरोदर आणि बाळंतिण महिलांसाठी दानशूरांच्या मदतीने गिझरची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने हे गिझर बसवले असून, यामुळे महिलांना गरम पाण्याने स्नान करणे शक्य झाले आहे.
स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू असून, पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून समाधान व्यक्त होत आहे.












