सावंतवाडी: शहरातील माठेवाडा येथील आत्मेश्वर मंदिरामागील इमारतीत राहणाऱ्या प्रिया चव्हाण या फार्मासिस्ट विवाहितेने आज सकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया चव्हाण या स्थानिक मेडिकलमध्ये फार्मासिस्ट म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती कामानिमित्त पुण्याला असतात. सावंतवाडी येथील त्यांच्या घरी सासू, सासरे आणि त्यांची लहान मुलगी असे कुटुंब राहत होते. आज सकाळी प्रिया चव्हाण यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. प्रिया चव्हाण यांच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.












