बेशिस्त पार्किंगकडे पोलीस आणि नगर परिषद प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष
राजापूर हायस्कुल परिसर बनतोय अनधिकृत वाहन तळ

राजापूर (वार्ताहर): राजापूर शहरातील जकातनाका ते जवाहरचौक आणि जवाहरचौक ते बंदरधक्का या मुख्य रस्त्यावर जागोजागी पार्क करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची होणारी कोंडी नित्याचीच बाब बनली असून त्याकडे पोलीस आणि नगर परिषद प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या दुतर्फा अगदी ‘नो पार्किंग झोन’ असताना देखिल बिनदिक्त लावल्या जाणाऱ्या वाहनांमुळे राजापूरातील वाहन चालक मालकांना सार्वजनिक शिस्तीचे वावडे आहे का? असा प्रश्न सामान्य नागरिकाला पडू लागला आहे. याच मार्गावरील राजापूर हायस्कुल परिसर नो पार्किंग झोन असताना त्याकडे सपशेल दुर्लक्ष करून अधिकृत पार्किंग झोन असल्याप्रमाणे वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे या बेशिस्त वाहन पार्कींगचा त्रास सामान्य पादचारी, विद्यार्थी आणि रूग्णांना होत आहे.
राजापूर शहर बाजारपेठेच्या प्रतिकुल भौगोलिक रचनेमुळे अनेक समस्यांना नागरिकांना सामना करावा लागतो. त्यामध्ये वाहतुक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चालला आहे. जेमतेम दोन एसटी बस कसोशीने सुटतील एवढीच जागा मुख्य रस्त्याची आहे. त्यामुळे तिसरे वाहन आल्यास वाहतुक कोंडी होणार हे नेहमीचेच बनले आहे. यावर उपाय म्हणून नगर परिषद प्रशासनाने ज्या ठिकाणी वाहतुक कोंडी होते किंवा अरूंद रस्ता आहे अशा ठिकाणी व शाळा, हॉस्पीटल अशा गर्दीच्या ठिकाणी ‘नो पार्किंग झोन’ घोषीत करून तसे फलक लावले आहेत. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी पोलीस प्रशासनाकडून होताना दिसत नाही. त्यामुळे वाहतुक कोंडी हा नित्याचीच बाब बनली आहे.
सध्या पावसाळयाचे दिवस असल्याने खर्ली नदीपात्रात ऐरवी पार्क
केली जाणारी वाहने ‘नो पार्किंग झोन’ असलेल्या राजापूर हायस्कुल परिसरात लावली जात आहेत. तर याच भागात बस थांबा, हायस्कुल, बँका, हॉस्पीटल, व्यायामशाळा अशा वेगवेगळया कारणाने गर्दी होत असल्याने या परिसरात मोठया प्रमाणात दुचाकी, आणि चारचाकी वाहने बेशिस्तपणे पार्क केलेली असतात.
या ठिकाणी राजापूर हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातच ही वाहने पार्क केलेली असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यातुन वाट काढत प्रवेश करावा लागत आहे. तर ही बेशिस्त पार्किंगची लाईन जोशी हॉस्पीटलकडे जाणाऱ्या रस्त्यापासून पुढे यश अर्पाटमेंट पर्यंत असल्याने अनेकदा हॉस्पीटलमध्ये येणाऱ्या अत्यवस्थ रूग्णाला आपले वाहन आत नेण्यासह रस्ता मोकळा नसल्याने त्याचा फटका रूग्णाला बसत आहे. शिवाय हॉस्पीटलच्या दैनंदिन व्यवस्थापनावरही त्याचा परिणाम होत असल्याचे डॉ. छाया जोशी यांनी सांगितले. एखाद्या रूग्णाची ने आण करण्यासाठी रूग्णवाहिका आणावयाची झाल्यास बेशिस्तपणे पार्क केलेल्या कारच्या मालकाला हुडकून काढून गाडी मागे घेवून रस्ता मोकळा करावा लागतो त्यानंतरच तो रूग्ण आत किंवा बाहेर पडू शकत असल्याची गंभीर बाब डॉ. जोशी यांनी निदर्शनास आणून दिली.
तसेच या ठिकाणी नगर परिषदेने एसटी बस थांबा बांधला आहे. या ठिकाणी एसटीसाठी वाट पाहत प्रवासी थांबलेले असतात. अनेकदा या बस थांब्यासमोरच वाहने पार्क केलेली असतात त्यामुळे हा थांबा नेमका कशासाठी बांधला आहे असा प्रश्न निर्माण होतो. तर एवढया बेशिस्त पार्किंगमध्ये भर म्हणून आठवडा बाजारासाठी येणारे भाजी विक्रेतेही रस्त्यावर ठाण मांडून बसत आहेत. मात्र याकडे नगर परिषद व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्याचा त्रास सामान्य पादचारी, विद्यार्थी आणि रूग्णांना होत आहे.
राजापूर नगर परिषदेने रस्त्यावर केल्या जाणाऱ्या बेशिस्त पार्किमुळे अपघात होण्यापुर्वी नगर परिषदेच्या ग्रामिण रूग्णालयाच्या जागेत पार्किंगची सोय करून रस्ता वाहतुकीस मोकळा ठेवावा आणि नो पार्किंग झोन खाली गाडया पार्क करणाऱ्या चालक मालकांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. स्वत:ची सोय बघताना दुसऱ्याची होणारी गैरसोय लक्षात येवू नये एवढेही सामाजिक भान या वाहन चालक मालकाना नाही कि सार्वजनिक शिस्तीचेच वावडे आहे असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.













