धामणंद प्रभागाची शिक्षण परिषद उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील माहे जून २०२५ ची शिक्षण परिषद न्यू इंग्लिश स्कूल आंबडस, ता. खेड येथे घेण्यात आली. प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी विद्या विलास गुजर यांचे अध्यक्षतेखाली सदर शिक्षण परिषद संपन्न झाली.
शिक्षण परिषदेमध्ये सन २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विजय बाईत यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच नासा- इस्त्रो , प्रज्ञाशोध, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचाही सत्कार सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रम, पायाभूत शिक्षण या विषयावर शाळा साखर चौकीची येथील शिक्षक रुपेश उतेकर यांनी मार्गदर्शन केले. चर्चासत्रात सर्वांनी सहभाग घेतला. केंद्र संसाधन गट स्थापना यावर संगीता वागरे मुख्याध्यापक शाळा पोसरे तांबड यांनी मार्गदर्शन केले. शाळा पोसरे खुर्द येथील मुख्याध्यापक विजय साखरे यांनी शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केले. खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विजय बाईत यांनी उपस्थित शिक्षकांना बहुमोल मार्गदर्शन केले. धामणंद तळवट पाल केंद्राच्या केंद्रप्रमुख प्रियांका पंडित, काडवली वावे केंद्राच्या केंद्रप्रमुख संपदा पत्याणे, चोरवणे केंद्राचे केंद्रप्रमुख माळीपरगे यांनीही मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी विद्या गुजर यांनी प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंबडस पलीकडे शाळेचे उपशिक्षक संजय शिंदे यांनी केले. शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी प्रभागातील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. सर्व मान्यवरांचे आभार आंबडस नंबर १ शाळेचे मुख्याध्यापक संतोष उतेकर यांनी व्यक्त केले.