अपघातात चार जखमी : दोघे गंभीर
आंबोली : पंढरपूर येथील आषाढी वारीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या गोवा येथील भाविकांच्या व्हॅगन आर गाडीला आजरा तालुक्यातील घाटकरवाडी कित्तवडे येथे अपघात झाला. या अपघातात चार भाविक जखमी झाले असून, त्यापैकी दोघे गंभीर तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
आतुर्ली, मये, डिचोली, गोवा येथील भाविक सुमारे दहा ते पंधरा दिवसांपूर्वी पायी वारीने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. रविवारी आषाढी वारीच्या दिवशी चंद्रभागेत स्नान करून श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी इतर ठिकाणीही देवदर्शन घेतले. सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हे सर्व भाविक पंढरपूरहून आपल्या गाडीने गोव्याला आपल्या गावी परत येत असताना, आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथील कित्तवडे फाट्यावर त्यांच्या व्हॅगनार कारला अपघात झाला. समोरून भरधाव येणाऱ्या गाडीचा अंदाज न आल्याने व्हॅगनार चालकाने अचानक ब्रेक दाबला. यामुळे व्हॅगनार रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात जाऊन पलटी झाली.
या अपघातात व्हॅगनारमध्ये बसलेल्या रिमा रत्नाकर चोडणकर (वय ५७, रा. आतुर्ली, मये, डिचोली, गोवा) आणि स्नेहल शिवराम नागवेकर (वय ६२) यांना गंभीर दुखापत झाली. तर दिव्या देवानंद कवठणकर (वय ४८) आणि शिवराम नारायण नागवेकर (वय ६७) (सर्व रा. आतुर्ली, मये, डिचोली, गोवा) या दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.
घाटकरवाडी कित्तवडे फाटा हे घटनास्थळ आंबोलीपासून सुमारे ११ किलोमीटर अंतरावर असल्याने, सर्व जखमींना ताबडतोब त्यांच्या दुसऱ्या गाडीने आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य पाहून येथील आरोग्य अधिकारी डॉ. अदिती पाटकर आणि डॉ. महेश जाधव यांनी अपघातातील जखमींना प्रथमोपचारानंतर अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.












