मासेमारी नौका पलटी होऊन एक मच्छीमार बेपत्ता…

मालवण मेढा समुद्रातील घटना : स्थानिक मच्छीमारांकडून शोध सुरू

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील मेढा येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली छोटी नौका वारा आणि लाटांच्या माऱ्यात पलटी होऊन तीन मच्छीमार पाण्यात फेकले गेले. यात दोघेजण बचावले असून एक मच्छीमार बेपत्ता झाला आहे. स्थानिक मच्छिमारांकडून त्याचा समुद्रात शोध सुरू आहे. ही घटना आज पहाटे ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.

दरम्यान घटनास्थळी पोलिस निरीक्षक मारुती जगताप, महादेव घागरे यांनी भेट देत माहिती घेतली. अपघातातील मासेमारी नौका किनाऱ्यावर आणण्यात आली आहे.

 

मालवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शहरातील मेढा जोशी वाडा येथील कीर्तीदा लीलाधर तारी (वय – २९), सचिन सुभाष केळुसकर (वय – ४२), जितेश विजय वाघ (वय – ३५) हे तीन मच्छीमार आज सकाळी मेढा येथील समुद्रात सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी वारा व मोठ्या लाटांच्या तडाक्यात मासेमारी नौका पलटी झाली. या तीनही मच्छीमार समुद्रात फेकले गेले. या अपघातात कीर्तीदा तारी व सचिन केळुसकर हे सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले. मात्र जितेश वाघ हा समुद्राच्या पाण्यात पडून बेपत्ता झाला आहे. स्थानिक मच्छीमारांच्या सहाय्याने त्याचा समुद्रात शोध सुरू आहे. अशी माहिती मालवण पोलिसांनी दिली.

 

 

मत्स्यव्यवसाय बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे सतत प्रशासनाच्या संपर्कात आहेत. बेपत्ता मच्छीमाराचा शोध घेण्याच्या दृष्टीने एनडीआरएफ टीम पाठवण्यात आली आहे. प्रशासकीय यंत्रणा स्थानिक यांच्या मदतीने शोध मोहीम सुरु आहे. अशी माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांनी दिली.