सावंतवाडी: रोटरी क्लब सावंतवाडी आणि रोटरी क्लब सेंट सायमन आयलंड, यू.एस.ए. रोटरी डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड (नॅब) सिंधुदुर्गसाठी उपलब्ध झालेल्या अत्याधुनिक आणि सुसज्ज ‘नेत्र तपासणी वाहना’चा लोकार्पण सोहळा उद्या सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार आहे. या ऑप्थाल्मिक मोबाईल व्हॅनच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन नॅब सिंधुदुर्गचे अध्यक्ष अनंत उचगांवकर यांनी केले आहे. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
श्री. उचगांवकर यांनी यावेळी माहिती दिली की, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी अशी व्हॅन उपलब्ध नव्हती. आता ही व्हॅन मिळाल्याने गावागावात जाऊन मोफत नेत्र तपासणी करणे शक्य होणार आहे. तसेच, ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करायची आहे, त्यांना ने-आण करण्यासाठीही या व्हॅनचा उपयोग होईल. जिल्ह्यातील प्रत्येक खेडेगावात ही सेवा देण्याचा नॅबचा मानस आहे.
ते पुढे म्हणाले की, दरवर्षी किमान ३६ हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया होतात. गरीब लोकांना मोतीबिंदू लक्षात येत नाही. नॅब माफक दरात या शस्त्रक्रिया करत असून, ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया केली जाईल. सध्या शासनाची कोणतीही योजना यासाठी उपलब्ध नाही. रोटरीच्या ग्लोबल ग्रँड अंतर्गत ४० लाख रुपयांच्या निधीतून ही व्हॅन उपलब्ध झाली आहे, यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. शासनाच्या महात्मा फुले योजनेत नॅब हॉस्पिटलचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. आजही नॅब अनेक लोकांवर शस्त्रक्रिया करत असून, सुसज्ज असे मॉड्युलर ऑपरेशन थिएटरही उभारण्यात आले आहे.
यावेळी नॅब सिंधुदुर्गचे सचिव सोमनाथ जिगजीन्नी, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष रो. ॲड. सिद्धार्थ भांबूरे, सचिव रो. सिताराम तेली, रो. डॉ. विनया बाड, रो. आनंद रासम, रो. सुबोध शेलटकर, रामदास पारकर, आबा कशाळीकर आदी उपस्थित होते.













