फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : कला आणि वाणिज्य महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत जूनियर व सीनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षितता व आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न झाली. पहिल्या सत्रात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पुरंधर नारे यांनी उपस्थित मान्यवरांचे व प्रशिक्षकांचे स्वागत करून या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री संदेश सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री महेश सावंत यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन करून आपली सायबर सुरक्षितता आपणच घेण्याचे आवाहन केले.
दुसऱ्या सत्रात इंडस टॉवर्स व नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी नवी दिल्ली यांच्यावतीने प्रशिक्षक अविनाश पाटील व सायली मुंज यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षितता म्हणजे काय व ऑनलाइन व्यवहार सुरक्षितपणे कसे करावेत, तसेच आपण कशा पद्धतीने आर्थिक साक्षर बनू शकतो याचे सविस्तर मार्गदर्शन केले. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऑनलाइन तंत्रज्ञानाचा वापर करताना फारच काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. स्मार्टफोन सारखे साधन काळजीपूर्वक वापरल्यास प्रगतीचे माध्यम ठरते, तर बेजबाबदारपणे वापरल्यास मोठे आर्थिक व सामाजिक नुकसान होऊ शकते. आज स्मार्टफोन द्वारे ई-मेल च्या माध्यमातून संदेशवहन केले जाते. व्हाट्सअप, फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम अशा अनेक ऑनलाईन समाज माध्यमाद्वारे संदेशांची देवाण-घेवाण केली जाते. याचा काळजीपूर्वक व गांभीर्याने वापर केला नाही तर सामाजिक बदनामी सामोरे जावे लागते. तर काही वेळेला आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषणही होऊ शकते. आपल्या विविध खात्यांचा पासवर्ड हा अक्षर, अंक व चिन्हे यांचा संमिश्र असावा म्हणजे तो सहजासहजी हॅक होऊ शकत नाही. आपल्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डवरील नंबर ची माहिती मिळवून व पिन विचारून आपली आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते. अनेकदा फसव्या जाहिराती, फसवे फोन कॉल्स, सेक्सटोर्शन व वेब लिंक्स याद्वारे विविध आमिषे दाखवून आर्थिक लुबाडणूक केली जाऊ शकते. हे लक्षात घेऊन आपले सर्व खात्यांचे पासवर्ड, पिन, डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे नंबर हे कुणालाही सांगू नयेत अथवा देऊ नयेत.
या कार्यशाळेत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच कला व वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मधील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












