चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण तालुक्यातील पाचाड चिलेवाडी येथील ग्रामस्थांनी आणि मुंबईतील चाकरमान्यांनी एकत्र येत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या उपक्रमांतर्गत श्रमदानातून सात बंधारे उभारले आहेत. याचबरोबर गावातील पडिक जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडही केली असून, अंतर्गत रस्त्यांवरील झाडाझुडपांची स्वच्छताही करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे पर्यावरण जपण्याबरोबरच पाण्याचा साठा आणि शाश्वत शेतीला हातभार लागणार आहे. या कामांची माहिती मिळताच चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती व पर्यावरणप्रेमी शौकत मुकादम, क्रांतीकचे सचिव जयंद्रथ खताते, विकास गमरे, पंचायत समितीचे अधिकारी श्री. दाभोळकर यांनी पाचाड चिलेवाडीला भेट दिली. त्यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून स्थानिक ग्रामस्थ व मुंबई मंडळातील चाकरमान्यांचे विशेष कौतुक करत आभार मानले. यावेळी शौकत मुकादम यांनी वृक्षलागवड, संवर्धन आणि जलसंधारणाच्या महत्वावर मार्गदर्शन केले. “अशा प्रकारचे उपक्रम गावोगावी पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री. चिले आणि ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. कुळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शेवटी स्थानिक मंडळाचे अध्यक्ष श्री. चिले यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.












