सोशल मीडियावर अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी युवक ताब्यात

सावंतवाडी : सोशल मीडियावर एका युवतीचे अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी संबंधित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर सायबर क्राईम विभागाच्या मदतीने केलेल्या तपासाअंती मळगाव येथील एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संबंधित युवकाने काही महिन्यांपूर्वी सदर युवतीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यानंतर सदर युवतीने सावंतवाडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली.

या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी सायबर क्राईम विभागाच्या मदतीने तपास केला होता. या तपासाअंती मळगाव येथील संबंधित युवकाला आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.