श्री रामेश्वर वि. मं. एडगांव नं. १ प्रशालेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 

श्री रामेश्वर कला व क्रीडा मंडळाचा स्तुत्य उपक्रम

 

वैभववाडी l प्रतिनिधी: श्री रामेश्वर कला व क्रीडा मंडळ एडगांव यांच्याकडून श्री रामेश्वर विद्यामंदिर एडगांव नं 1 शाळेतील व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी रामेश्वर कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष निनाद रावराणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रताप रावराणे, संभाजी गुरव, विनोद रावराणे, रवींद्र रावराणे, महेश पाटील, राजू पवार, सचिन रावराणे, नवनाथ गुरव, योगेश पवार, नेहा पवार, निलेश रावराणे, संकेत सुतार, निलेश गुरव, निखिल रावराणे, संचित गुरव, शैलेश रावराणे, रुची पवार, वनिता पवार व मंडळाचे कार्यकर्ते तसेच पालक उपस्थित होते.

रामेश्वर कला व क्रीडा मंडळ एडगाव यांच्या वतीने प्रतिवर्षी येथील शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. या साहित्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या, पेन तर अंगणवाडीच्या मुलांसाठी रंगीत खडू व कला साहित्य याचा समावेश करण्यात आला आहे. मंडळाच्या वतीने यापूर्वीही शालेय भौतिक विकासात मोलाचे योगदान देऊन शाळेच्या व्हरांड्यासाठी स्वखर्चाने छप्पर उपलब्ध करून दिले आहे. तसेच विविध शालेय-सहशालेय उपक्रमांमध्ये या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन ‘शाळा हा गाव विकासाचा केंद्रबिंदू’ मानून पुढाकार घेतला आहे. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते राजू पवार यांनी मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी मंडळाचे सर्व कार्यकर्ते हे श्री रामेश्वर विद्यामंदिर एडगांव नं 1 शाळेचे माजी विद्यार्थी असून अद्यापही शाळेविषयी ओढ व आस्था सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळेच सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होण्यात या मंडळाला प्राधान्य द्यावे व ज्यावेळी मंडळाच्या मदतीची गरज असेल त्यावेळी कोणत्याही कार्यकर्त्याला हाक द्यावी, आम्ही सर्वजण शालेय व गाव विकासासाठी अधिकाधिक योगदान देण्यासाठी प्रयत्न करून असे आश्वस्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रताप रावराणे यांनी केले तर सूत्रसंचालन चेतन बोडेकर यांनी केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका दिप्ती पाटील यांनी उपस्थितांचे व मंडळाचे आभार मानले.