राजापूर (वार्ताहर): राजापूर शहरामध्ये सन २०२१-२२ वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर झालेल्या निधीमधून जवाहरचौकातील पूलाचे पुलाचे सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. मात्र हे काम योग्य दर्जाचे होत नसून शासनाच्या निधीचा अपव्यय होत आहे. त्यामुळे जो पर्यंत हे काम योग्य दर्जाचे होत नाही तोपर्यंत संबधीत ठेकेदाराचे बील अदा करणेत येवू नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किरण शिवलकर यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदरचा पूल हा खूप जूना आहे. अवजड वाहनांसहीत तो वाहतुकीस चालू आहे. सदरच्या पुलाला दोन्ही बाजूने तारेचे रेलिंग करून त्याला जाळी गुंडाळून त्यावर हाताने सिमेंट लावण्याचे काम चालू आहे. वास्तविक पुलाला संरक्षक म्हणून चांगल्या पध्दतीचे रेलिंग आवश्यक आहे. कारण त्यावरून कधी राजापूर शहरामध्ये मोठा पूर आल्यास पुराचे पाणी जाते. काही वर्षापूर्वी पुराच्या पाण्यामुळे पूर्वीचे मजबूत असे रेलिंग तुटलेले आहे. तसेच लहान शाळेतील मुले कुतुहल म्हणून त्याला पकडून चालत जातात. त्यावर बसतात. वयोवृध्द माणसे रेलिंगला टेकून बसतात. यात काही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करीता ते काम तातडीने थांबवून चांगले मजबूत असे रेलिंग करावे असे पत्र मी दि. २४/०७/२०२५ रोजी मुख्याधिकारी नगरपरिषद राजापूर यांना दिले होते. महत्वाचे म्हणजे या संदर्भात वर्तमानपत्रातून बातमीही प्रसिध्द झाली होती आणि त्यावर कोणतीही उपाययोजना न करता नगरपरिषद राजापूर यांनी त्यांचे आदेशाने किंवा ठेकदारीच्या मनमानी कारभाराने सुशोभिकरणाचे काम संबंधित ठेकेदाराने रविवार दि. २७/०७/२०२५ रोजी सकाळपासून पुन्हा एकदा काम करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे शासनाच्या या निधीचा गैरवापर होवू नये याच हेतूने मी आपल्याकडे या संदर्भात वरील कामाची तक्रार लेखी स्वरूपात देत आहे. महत्वाचे म्हणजे कोणत्याही वाहतूक करणा-या पुलाचे असे सुशोभिकरण का करतात हाच विचार करण्याचा मुद्दा आहे. भविष्यात जर येथून कोणतीही मनुष्यहानी झाल्यास याला जबाबदार संपूर्णपणे नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित ठेकेदार असेल,तरी वरील कामाची आपण आपल्या खात्यामार्फत अधिकारी नेमून प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश द्यावेत व त्या सुशोभिकरणाच्या कामाला स्थगिती द्यावी मागणी या निवेदनाद्वारे शिवलकर यांनी केली आहे.











