रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पुलावरून खाली कोसळला. टँकरमधून गॅस लीक होत असल्याचे लक्षात येताच, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ खबरदारीचा उपाय म्हणून महामार्ग बंद करण्यात आला.
जिल्हा प्रशासनाने अपघातस्थळी गॅस ट्रान्सफरसाठी दुसऱ्या टँकरची व्यवस्था केली. ही प्रक्रिया मध्यरात्री 2 वाजता सुरू करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर अपघात ग्रस्त टँकर सुद्धा बाहेर काढण्यात आला. अपघाताचे ठिकाण नागरी वस्तीच्या जवळ असल्याने अतिरिक्त दक्षता घेतली गेली.
यामुळे मुंबई-गोवा महामार्ग तब्बल 15 तास 10 मिनिटे बंद राहिल्यानंतर मंगळवारी दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली आहे.













