भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचा ४१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : येथील राणी जानकीबाईसाहेव वैद्यकीय संस्थेच्या भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचा ४१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित सोहळ्यात महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी, उत्कृष्ट शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाच्या १९८९ च्या बॅचच्या विद्यार्थिनी आणि गडहिंग्लज येथील कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. शिवानी संजीव गवंडे उपस्थित होत्या. संस्थेचे सचिव श्री. गणेश बोर्डेकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय दळवी यांच्या हस्ते डॉ. गवंडे यांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात डॉ. गवंडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या सोहळ्यात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आणि २०२२-२३ च्या बी.ए.एम.एस. परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रथम वर्ष बी.ए.एम.एस २०२३-२४ मधील कु. तांबोळी साफीन मुस्तफा (प्रथम), कु. सरमळकर अदिती सुरेश (द्वितीय) आणि चव्हाण विनया दिपक (तृतीय) यांचा गौरव करण्यात आला. तसेच, प्रथम वर्ष बी.ए.एम.एस २०२२-२३ मधील कु. सिंह रोशनी मुकेश (प्रथम), कु. साहू साक्षी हरिहर व गजेंद्रगडकर नागेश श्रीनिवास (द्वितीय) आणि गवड सानिका उमेश (तृतीय) यांनाही सन्मानित करण्यात आले.

याचबरोबर, द्वितीय वर्ष बी.ए.एम.एस. २०२१-२२ च्या परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या बाकी नविन राजेश (प्रथम), कु. मांजरेकर राधिका भवन व कु. रसाळ कांचन सुर्यकांत (द्वितीय) आणि कु. पवार श्वेता ज्ञानेश्वर (तृतीय) यांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी महाविद्यालयातील उत्कृष्ट शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. यामध्ये प्राध्यापक डॉ. बी.डी. पाटील (उत्कृष्ट अध्यापक), सौ. स्लेहलता मुननकर (उत्कृष्ट लिपिक), सौ. सपना परब (अधिपरिचारिका) आणि श्री. विठ्ठल मोहिते (शिपाई) यांचा समावेश होता.

कार्यक्रमादरम्यान, माजी प्राचार्य डॉ. विकास कठाणे, डॉ. शिवप्रसाद म्हेत्रे आणि वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सागर पाटील यांच्याकडून ५१ हजार रुपयांची देणगी महाविद्यालयाला मिळाली. या देणगीच्या व्याजातून ‘स्वस्थवृत्त’ विषयात विद्यापीठात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला दरवर्षी वर्धापनदिन सोहळ्यात पारितोषिक दिले जाईल, असे जाहीर करण्यात आले.

याप्रसंगी माजी प्राचार्य डॉ. दिपक तुपकर व डॉ. विकास कठाणे, प्राचार्य डॉ. संजय दळवी, संस्थेचे सचिव श्री. गणेश बोर्डेकर आणि संचालक श्री. अमोल सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र पाटील यांनी केले. प्रकाश पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले, तर श्री. भार्गवराम शिरोडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्याला संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री. सी.एल. नाईक, शिक्षक, कर्मचारी, रुग्णालयीन कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.