जालगाव व्यापाऱ्यांचे अनुकरण महाराष्ट्राने करावे : डॉ . प्रशांत परांजपे

दापोली :- दापोली तालुक्यातील जालगाव व्यापारी संघटना आणि जालगाव चा व्यापार हा नेहमीच आपली स्वतंत्र ओळख राखत आला आहे.
शासन निर्णय होण्यापूर्वीपासून जालगाव व्यापारी संघटनेच्या माध्यमातून गुटखाबंदी आणि प्लास्टीक कॅरीबॅग वाटप बंदी अशी स्वतःहून सुरुवात केली आहे. 2001 पासून या बंदीचं प्रामुख्याने पालन केलं जात आहे. ग्रामपंचायत जालगाव कार्यक्षेत्रात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत विविध उपक्रम सुरू आहेत. येथील किरकोळ भाजीविक्रेते देखील प्लास्टीकच्या कॅरीबॅगचा वापर करित नसून कापडी पिशवीच आवर्जून ग्राहकांना देताना दिसतात. जालगाव मधील बहुतांश ग्रामस्थ हे खरेदी करताना ग्राहक म्हणून जाताना स्वतःची कापडी पिशवी सोबत घेऊन जात असतात. हे निश्चितच लक्षवेधी आहे.
कचरा प्रश्न आणि प्लास्टिक विघटन हा प्रश्न जगासमोर आ वासून उभा असताना जालगाव मधील व्यापाऱ्यांचे हे कृतीत्मक धोरण निश्चितच अवघ्या महाराष्ट्राने नव्हे तर जगाने अनुकरण करण्यासारखे आहे ही अभिमानाची आणि अभिनंदनाची बाब असल्या बाबत पर्यावरण तज्ञ डॉक्टर प्रशांत परांजपे यांनी विशेष अभिनंदन व्यक्त केले आहे.