चिराग चितारीचे मलेशियात जागतिक पातळीवर यश

सावंतवाडी/ प्रतिनिधी :नुकत्याच मलेशियातील जोहर बाहरु येथे पार पडलेल्या जागतिक अंकगणित व अबॅकस स्पर्धेत सावंतवाडीचा चिराग पूजा राजेश चितारी याने उज्ज्वल यश संपादन केले आहे. या स्पर्धेत चिरागने अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक मिळवत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली चमक दाखवली.

 

२ ऑगस्ट रोजी झालेल्या या स्पर्धेत जगभरातील सुमारे २,००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. भारतातून केवळ ३५ विद्यार्थ्यांची निवड झाली होती, त्यात चिरागने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.

 

चिरागने अंकगणित व अबॅकसचे प्रशिक्षण सावंतवाडी भटवाडी येथील एड्युस्मार्ट इंक संस्थेमार्फत, संचालिका सौ. सपना पिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आहे.

 

चिरागच्या या जागतिक यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, सावंतवाडीचा मान उंचावल्याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.