माजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलीफे यांनी पुन्हा एकदा जपली सामाजिक बांधिलकी
राजापूर (प्रतिनिधी): शहरातील सामाजिक प्रश्नांबाबत जाण असणाऱ्या माजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलीफे यांनी पुन्हा एकदा शहरवासीयांची मने जिंकली आहेत. रत्नागिरी येथील राजरत्न प्रतिष्ठान व राजापूर पोलिसांच्या सहकार्याने राजापूर शहरात गेल्या काही दिवस विचित्र अवस्थेत फिरणाऱ्या एका मनोरूग्णाला उपचारासाठी रत्नागिरीतील मनोरूग्णालयात पाठविले आहे.
राजापुर शहरात गेले काही दिवस एक मनोरूग्ण फिरत होता, सार्वजनिक ठिकाणी तो अस्वच्छता करत होता, याचा शहरातील व्यापारी व नागरीकांसह शहरात येणाऱ्या ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी होत होती. नगरपरिषद प्रशासनाकडे याबाबत कैफियत नागरिकांनी तक्रार केली असता, ते आमचे काम नाही, असे सांगून नगरपरिषद प्रशासनाने हातवर केले. त्यानंतर काहींनी ॲड. खलिफे यांच्याशी संपर्क साधला. याची तात्काळ दखल घेत माजी नगराध्यक्ष ॲड. खलिफे यांनी रत्नागिरी येथील राजरत्न प्रतिष्ठान या संस्थेशी संपर्क साधून राजापूर पोलिसांच्या सहकार्याने या मनोरूग्णाची रवानगी रत्नागिरी येथील मनोरूग्णालयात केली आहे.
यापुर्वीही अशाच प्रकारे शहरा मनोरूग्णांची संख्या वाढली होती. त्यावेळीही या मनोरुग्णांच्या उचापतीनी व्यापारी, सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते. काही मनोरूग्णांनी तर गाडयांच्या काचा फोडणे, मारहाण करणे असे प्रकारही केले होते. त्यावेळीही पुढाकार घेत ॲड. खलिफे यांना या रूग्णांना रत्नागिरीतील मनोरूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.
आता पुन्हा एकदा पुढाकार घेत ॲड. खलिफे यांनी या मनोरूग्णाला रत्नागिरीत उपचारासाठी दाखल केले आहे. याबद्दल ॲड. खलिफे यांना नागरीकांतून धन्यवाद देण्यात येत आहेत.
यावेळी राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, राजापूर नगरपरिषद आरोग्य मुकादम राजन जाधव, संदेश जाधव तसेच अजिम जैतापकर, परवेज मुंगी, सतिश बंडबे रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानचे पदाधिकारी छोटू खामकर, रुपेश सावंत, श्री. सावंत आदी उपस्थित होते.












