आ. केसरकर यांची पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक
पर्यटन मंत्री लवकरच देणार प्रकल्पांना भेट
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्याचे पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांची मुंबई येथील मेघदूत बंगल्यातील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील पर्यटन प्रकल्पांना गती देण्याबाबत दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीत प्रामुख्याने वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर येथे प्रस्तावित ताज ग्रुपच्या हॉटेल प्रकल्पावर चर्चा करण्यात आली. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास जावा यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला.
यासोबतच, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील निवती येथील निवती रॉक येथे प्रस्तावित सबमरीन (पाणबुडी) प्रकल्पाला चालना देण्याबाबतही चर्चा झाली. हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याकरिता लवकरच एक विशेष बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांनी दिले.
या दोन्ही प्रमुख प्रकल्पांव्यतिरिक्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील इतर प्रस्तावित पर्यटन प्रकल्पांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांनी या सर्व प्रकल्पांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ते लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. या भेटीमुळे सिंधुदुर्ग आणि विशेषतः वेंगुर्ला तालुक्यातील पर्यटन विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.













