रत्नागिरी | प्रतिनिधी :
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि भारत मौसम विभागाच्या संयुक्त विद्यमाने जाहीर हवामान अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात १४, १६, १७ आणि १८ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच १५ ऑगस्ट रोजीही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. या काळात मेघाच्छादन कायम राहणार असून कमाल व किमान तापमान सरासरी इतकेच राहण्याचा अंदाज आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलेला सल्ला —
-
रासायनिक खते, कीटकनाशके व बुरशीनाशके फवारणीची कामे पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलावीत.
-
भात, नागली, आंबा, काजू, सुपारी, नारळ, हळद व भाजीपाला पिकांमध्ये साचलेले अतिरिक्त पाणी तात्काळ काढावे.
-
भातखाचरातील बांध मजबूत ठेवावेत व तणमुक्त करावेत.
-
नारळ, आंबा व काजू बागांतील नव्या लागवडीच्या रोपांजवळ पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच रोपांना आधार द्यावा.
-
मुसळधार पावसामुळे सुपारी पिकाला खते देणे टाळावे; कारण ती वाहून जाण्याची शक्यता आहे.
-
हळद, वेलवेली व भाजीपाला पिकांमध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
-
जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत व शक्यतो झाडाखाली बांधू नयेत.
तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनेनुसार, १७ ते २३ ऑगस्ट दरम्यान कोकणात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पावसापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती तयारी ठेवावी.











