फोंडाघाट महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा !*

 

*महाविद्यालयात क्रांतिवीरांच्या जीवनावर आधारित भितीपत्रिकेचे उद्घाटन संपन्न !*

 

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन फोंडाघाट येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात देशभक्तीच्या वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वज फडकताच उपस्थितांनी ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताने देशाभिमान व्यक्त केला.ध्वजारोहणानंतर महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातील विद्यार्थ्यांनी सलामी देत आकर्षक संचलन सादर केले. प्राचार्य डॉ. नारे यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारकांचे त्याग, लोकशाही मूल्यांचे महत्त्व आणि विद्यार्थी वर्गाने देशाच्या प्रगतीत घ्यावयाची भूमिका यावर प्रकाश टाकला. त्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशसेवेची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमानंतर महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या वतीने सर्व उपस्थितांना खाऊचे वाटप करण्यातआले. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीपर गीतांच्या स्वरांनी आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला.

 

 

 

 

फोंडाघाट महाविद्यालयात क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित भित्तिपत्रिकेचे उद्घाटन

कला आणि वाणिज्य महाविद्यालयात हिंदी विभागामार्फत क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित विद्यार्थी लिखित व संकलित भित्तिपत्रिकेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिंदी विभागाध्यक्ष डॉ. संतोष रायबोले यांनी भित्तिपत्रिकेची उद्दिष्टे व भूमिका विशद करताना विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांच्या कार्याची ओळख करून देण्यामागील हेतू स्पष्ट केला. यानंतर टी.वाय.बी.ए. वर्गातील विद्यार्थिनी कु. रिया मेस्त्री हिने भित्तिपत्रिकेवरील आपले मनोगत व्यक्त करत, अशा उपक्रमांमुळे देशभक्तीची भावना वृद्धिंगत होते, असे मत मांडले.अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. नारे यांनी भित्तिपत्रिकेचे कौतुक करत स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतिकारकांचे अमूल्य योगदान विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमातून प्रेरणा घेऊन समाजासाठी कार्य करावे, असे आवाहन केले.

 

 

 

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. रायबोले यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.