पाच कर्मचाऱ्यांनीच केली संगनमताने कंपनीची आर्थिक फसवणूक
लांजा (प्रतिनिधी) लांजा येथील मुथूट फायनान्स कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांनी संगनमताने २६ लाख ८१ हजार रुपयांचा अपहार करून संस्थेची आर्थिक फसवणूक केली आहे .या प्रकरणी कंपनीच्या पाचही कर्मचाऱ्यांवर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक २४/०६/२०२४ ते ०५/०५/२०२५ या कालावधीतील हा अपहाराचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मुथूट फायनान्स कंपनीचे क्लस्टर मॅनेजर संजय चुडाजी राऊळ (४४, राहणार वेर्ले तळेवाडी, सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग) यांनी लांजा पोलीस ठाण्यात केली आहे. मुथूट फायनान्सच्या लांजा शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून काम करणारा सुनील तुकाराम गुरव (व ५४, मुळगाव करूळ, वैभववाडी, सिंधुदुर्ग ,सध्या राहणार कनावजेवाडी लांजा), जूनियर रिलेशन एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणारा प्रसाद सिताराम रामाने (वय २८ वर्षे राहणार लांजा आगरवाडी), रोखपाल व ज्युनिअर रिलेशन एक्झिक्यूटिव्ह सुशांत सुनील धाडवे (वय २७, राहणार पाथरट पाली जिल्हा रत्नागिरी), ओंकार दिवाकर थारळी (वय २६, राहणार मोगरे राजवाडी तालुका राजापूर) आणि जुनियर रिलेशन एक्झिक्यूटिव्ह तुषार गजानन वाडेकर (वय २७ वर्षे राहणार लांजा खावडकरवाडी) या पाचही जणांनी वरील कालावधीत कंपनीचे कर्मचारी असल्याचा गैरफायदा उठवत मुथूट फायनान्स कंपनी लांजा येथे खातेदार यांच्या तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये एकमेकांच्या संगनमताने छेडछाड करून आणि सोन्याचे दागिने बदली करून सोन्याचा चालू बाजारभावाप्रमाणे एकूण सोने २७३.७ ग्रॅम चा एकूण रुपये २३ लाख ९६ हजार व मुथूट कंपनीची परवानगी न घेता साक्षीदार कांता कमलाकर कुरूप यांना त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यात २ लाख ८५ हजार रुपये देऊन एकूण २६ लाख ८१ हजार रुपयांचा अपहार करून मुथूट कंपनीची आर्थिक फसवणूक केली .
गेल्या काही महिन्यांपासून मुथूट फायनान्स मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर कंपनीचे जनरल मॅनेजर किरण जी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे लांजा पोलीस ठाण्यात झालेल्या तक्रानुसार लांजा पोलिसांनी वरील पाचही कर्मचाऱ्यांवर लांजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६(५), ३१८(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल सरंगळे करत आहेत.
लांजा तालुक्यातील फसवणूक झालेल्या नागरिकांनी तक्रार करावी – पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे
मुथुट फायनान्स लांजा शाखेतील उघड झालेल्या घोटाळ्या संदर्भात लांजा तालुक्यातील अजून कोणत्या नागरिकांची मुथुट फायनान्स लांजा शाखेत फसवणूक झाली असेल, तर याबाबत त्यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार करावी. असे आवाहन लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी केले आहे.











