-
४८ व्यापारी संकुले व इमारतींना नोटिसा
-
७ दिवसांत कारवाईचा इशारा
चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. तब्बल ४८ व्यापारी संकुले व इमारतींना पार्किंगसंदर्भात गंभीर उल्लंघन केल्याबद्दल नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. येत्या सात दिवसांत आवश्यक सुधारणा न झाल्यास थेट दंडात्मक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा नगरपालिकेने दिला आहे.
शहरातील अनेक व्यापारी संकुले व खासगी इमारतींनी बांधकाम परवान्याच्या अटींनुसार पार्किंगची सोय न करता ती जागा व्यापारी उपयोगासाठी वळवली आहे. परिणामी रस्त्यावर वाहनांचा ताण वाढत असून वाहतूक कोंडी अधिकच गंभीर होत आहे. विशेषत: सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत शहरातील प्रमुख रस्त्यांवर गोंधळ निर्माण होत आहे. आगामी गणेशोत्सव काळात शहरात भाविकांची मोठी गर्दी येणार असल्याने वाहतुकीचा प्रश्न अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच नगर पालिका प्रशासनाने वेळीच कठोर भूमिका घेत पार्किंग व्यवस्थेतील त्रुटींवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पाठवलेल्या नोटिसांमध्ये संबंधित व्यापारी संकुले व इमारतींच्या मालकांना सात दिवसांत योग्य पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कालावधीत सुधारणा न झाल्यास जागा सील करणे, दंड आकारणे अशा कठोर कारवाया केल्या जातील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून चिपळूणकरांना वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग व रस्त्यावर वाहनांचा प्रचंड ताण यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गालगत व शहरातील प्रमुख चौकांमध्ये समस्या गंभीर झाली असून नागरिकांचा रोष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नगर पालिका प्रशासनाने सज्ज होत पार्किंग व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे. नगर पालिकेचे अधिकारी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करतील. नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांना कोणतीही सवलत न देता कठोर कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत चिपळूणमध्ये पार्किंग संदर्भातील मोठ्या प्रमाणावर कारवाई होण्याची शक्यता आहे.













