पालकमंत्री नाम. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
वैभववाडी l प्रतिनिधी : वैभववाडी रेल्वे स्टेशन येथे उभारण्यात आलेल्या पादचारी पुलाचा लोकार्पण सोहळा आज दि. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. याप्रसंगी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे. याप्रसंगी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा उपस्थित राहणार आहेत.
वैभववाडी रेल्वे स्टेशनवरून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. या ठिकाणी एकुण दोन प्लॅटफॉर्म आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्म वर रेल्वे रुळावरून प्रवाशांना जावे लागत होते. पादचारी पूल व्हावा अशी अनेक दिवसांपासून प्रवाशांची मागणी होती. माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे व नामदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून हा पूल मंजूर झाला. काही महिन्यापूर्वी या पुलाचे भूमिपूजन ही पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले होते. हा पूल बांधून पूर्ण झाला आहे. उद्घाटनानंतर हा पूल प्रवाशांसाठी खुला होणार आहे. तरी या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.









