
राजापूर | वार्ताहर : आज नाचणीसह अन्य भरडधान्य सदृढ आरोग्यासाठी फायदेशीर असून त्याला बाजारपठेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यातून भरड धान्यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची ताकद असून शेतकऱ्यांनी नाचणीसह भरडधान्याची जास्तीत जास्त लागवड करून श्रीमंत व्हावे असे आवाहन सिंधुरत्न समृद्धी समितीचे संचालक व भाजपाचे कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले.
यावेळी त्यांनी जगासह बाजारपेठेतील मागणीचा ट्रेन्ड ओळखून आता शेतकऱ्यांनी पिके घ्यावी असा मौलिक सल्लाही जठार यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिला. यावेळी सिंधुरत्न समृद्धी समिती, कृषी विभाग आणि स्नेहरत्न कृषी संघ राजापूर यांच्यावतीने नाचणीसह अन्य भरडधान्याच्या बियाण्यांचे राजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात आले.
पंचायत समितीच्या किसानभवन सभागृहामध्ये सिंधुरत्न समृद्धी समिती, कृषी विभाग आणि स्नेहरत्न कृषी संघ राजापूर यांच्यावतीने भरडधान्य लागवड मार्गदर्शन व मोफत बियाण्यांचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिंधुरत्न समृद्धी समिती सदस्य श्री. जठार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघाचे अध्यक्ष हेमंत सावंत, संदीप राणे, पंकज दळवी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुहास पंडीत, तालुका कृषी अधिकारी अनिल गावित, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर, माजी पंचायत समिती सदस्य पूर्णिमा मासये, कृषी विस्तार अधिकारी प्रभाकर आपटे आदी मान्यवरांसह मोठ्यासंख्येने शेतकरी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्री. जठार म्हणाले की, “ भरडधान्याला बाजारपेठेमध्ये मोठ्याप्रमाणात मागणी असून त्याच्यामध्ये शेतकर्यांना श्रीमंत करण्याची क्षमता आहे. त्याचा लाभ घेवून आपली उन्नती साधण्यासाठी शेतकऱ्यांनी भरडधान्याची लागवड करावी. त्यासाठी आवश्यक लागणारे सर्वतोपरी सहकार्य सिंधुरत्न समृद्धी समितीकडून शेतकर्यांना केले जाईल.” शेतकर्यांनी आता अन्नदाता न होता त्याच्या जोडीने उर्जादाता व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी श्री. राणे यांनी भरडधान्याच्या पिकांचे आरोग्याच्यादृष्टीने महत्व विषद करताना उपलब्ध बाजारपेठ आणि मागणीविषयी सविस्तर माहिती दिली. तर, तालुका कृषी अधिकारी श्री. गावित यांनी भरडधान्यांविषयी माहिती देताना कृषी विभागाच्या विविधांगी योजनांची माहिती दिली. तत्पूर्वी, या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना कृषी अधिकारी श्री.पंडीत यांनी नाचणी पिकासह भरडधान्यांची सविस्तर माहिती देत या पिकांची जास्तीत जास्त लागवड करावी असे आवाहन केले. तालुक्यातील ज्या शेतकर्यांना नाचणी पिकासह भरडधान्यांच्या बियाण्यांची आवश्यकता आहे त्यांची पंचायत समितीच्या कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
फोटो 28 आरजेपी 2।3
राजापुरातील भरडधान्य लागवड मार्गदर्शन शिबीरात बोलताना प्रमोद जठार याप्रसंगी अन्य मान्यवर तर दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित शेतकरी वर्ग











