आजपासून मुंबई, पुण्याच्या दिशेने बसेस रवाना होणार
कणकवली : गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी २५९ बसेसचे बुकिंग झाले आहे. उद्यापासून बसेस जिल्ह्यातील विविध आगारातून सोडण्यात येणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या चाकरमान्यांनी यंदा एसटी बसला पसंती दिली. चाकरमान्यांना घेऊन सुमारे १ हजार गाडया सिंधुदुर्गात दाखल झाल्या होत्या. परतीच्या प्रवासासाठी २५९ बसेसचे बुकिंग फुल्ल झाले आहे. उद्यापासून या बसेस जिल्ह्यातील आगारातून मुंबई व पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहेत.
मंगळवार २ सप्टेंबरला २० बसेस सिंधुदुर्गातून मुंबईकडे रवाना होणार आहेत. ३ सप्टेंबरला ११८ बसेस मुंबईकडे रवाना होणार आहेत, याच दिवशी ७ बसेस पुण्याकडे रवाना होणार आहेत. ४ सप्टेंबरला ७५ बसेस मुंबईकडे तर ३ बसेस पुण्याकडे रवाना होणार आहेत. ७ सप्टेंबरला ३५ बसेस मुंबईकडे तर १ बस पुण्याकडे रवाना होणार आहे. गणेशोत्सवासाठी गावी येणार चाकरमानी रेल्वे, खासगी बसेस, एसटीसही खासगी वाहनांनी यंदा सिंधुदुर्गात दाखल झाले. यंदाही चाकरमान्यांनी एसटीला पसंती दिली. जिल्ह्यात यंदा मुंबईसह अन्य महानगरांतून १ हजारहून अधिक बसेस दाखल झाल्या होत्या. चाकरमान्यांना आणण्यासाठी बसेस मुंबई पाठविण्यात आल्याने गणेशोत्सवाच्या सुरुवातीला स्थानिक प्रवाशांची गैरसोय झाली होती. त्यानंतर स्थानिक पातळीवरही नियमित बसेससोबतच जादा बसेसचीही व्यवस्था करण्यात आली आली होती. त्यामुळे प्रवाशांना गैरसोय झाली नाही..












