मंडणगडात पाच दिवसांच्या गणपती बाप्पासह गौराईंचे विसर्जन

मंडणगड : प्रतिनिधी

गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर, गणपती गेले गावाला, चैन पडे ना आम्हांला अशा जयघोषात तालुक्यात भाविकांनी पाच दिवसांच्या गौरी बाप्पाला भक्तिभावाने निरोप दिला. तालुक्यात एकूण 2264 घरगुती गणेशमुर्ती, 8 सार्वजनीक गणेश मुर्ती व 495 गौराईंचे विसर्जन करण्यात आले. यात मंडणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 1856 घरगुती गणेशमुर्ती, 6 सार्वजनीक गणेशमुर्ती व 350 गौराईंचे विसर्जन करण्यात आले. बाणकोट सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 400 घरगुती गणेश मुर्ती २ सार्वजनीक गणेश मुर्ती व 143 गौराईंचे विसर्जन करण्यात आले.

तालुक्यात वाडी वस्त्यांवर पाच दिवसांचे गणपती मोठ्या संख्येने येतात. गणपती बाप्पांसह, गौराईचेही आगमन थाटात करून यावर्षीचा गणेशोत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात आला. घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणपतींच्या आगमनाने सर्वत्र वातावरण आनंदीत झाले होते. गणरायासाठी केलेली आरास तसेच देखावे यावर्षी खास आकर्षण ठरले. संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असणारा हा गणेशोत्सव साऱ्यांनी आनंदात साजरा केला. बाप्पांना निरोप देण्याचा क्षण जवळ आल्यानंतर भाविकांनी जड अंतःकरणाने पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देऊन बाप्पांना विसर्जित केले. बाप्पाच्या आगमन ढोलताशांच्या गजरात वाजत-गाजत जल्लोषात करण्यात आले. तसा त्याला निरोपही वाजत-गाजत आनंदाची उधळण करत देण्यात आला. पावसाने जराशी उसंत घेतल्याने अतिशय शिस्तबद्ध रितीने प्रत्येक गावात, वाडीत विसर्जन मिरवणुक काढण्यावर भाविकांचा यावर्षी अधिक भर दिसून आला. तसेच पारंपारिक वाद्यांचा अधिक अंतर्भाव मिरवणुकीत दिसून आला. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मंडणगडचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे, बाणकोट सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय चव्हाण, तालुका होमगार्ड समादेशक अधिकारी प्रदीप मर्चंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.