करुळ घाटात कोसळली दरड : वाहतूक ठप्प
वैभववाडी प्रतिनिधी
करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना आज सकाळी 7 वा. च्या सुमारास घडली. मार्ग बंद झाल्याने वाहतूक इतर पर्यायी मार्गे वळविण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसला आहे. तर परजिल्ह्यात जाणाऱ्या एसटी बस फोंडाघाट मार्गे वळविण्यात आल्या आहेत. दरड हटवण्याचे काम संबंधित यंत्रणेच्या वतीने युद्ध पातळीवर सुरू आहे. वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
संततधार पडणाऱ्या पावसाचा फटका करुळ घाटाला बसला आहे. गुरुवारी सकाळी दरडीचा मोठा भाग रस्त्यावर येऊन पडला. मोठमोठ्या दरडी रस्त्यात आल्याने वाहतूक बंद झाली आहे. दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलीस तसेच संबंधित यंत्रणेमार्फत दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.











