सावंतवाडीत जुगारावर पोलिसांची धाड : ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

सावंतवाडी: शहरातील जिमखाना परिसरात पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १३,२५० रुपये रोख रक्कम, ३ मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पहाटे ४ वाजता करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, हेमंत शामराव रंकाळे (वय ३५, रा. न्यू खासकील वाडा, सावंतवाडी) हा रोहन लहू पाटील (वय २२, रा. जिमखाना सावंतवाडी) आणि पांडू बापू पवार (वय ५५, रा. शिरोडा, ता. वेंगुर्ला) यांना सोबत घेऊन होळीचा खुंट, पांगम गल्ली येथील एका उघड्या शेडमध्ये जुगार खेळ खेळवत होता.

सावंतवाडी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी, प्लास्टिक कागदाच्या आडोशाखाली ‘अंदर-बहार’ नावाचा जुगार खेळ सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. तर पळून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या कारवाईत एकूण १३,२५० रुपये रोख रक्कम, जुगारासाठी वापरले जाणारे पत्ते आणि ३ मोबाईल फोन असा एकूण ३५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पीएसआय प्रमोद पाटील, पीएसआय माधुरी मुळीक, पो.हवा. शिगांडे, पो.कॉ. पाटील आणि चालक चव्हाण यांच्या पथकाने केली. याबाबत पुढील तपास पो.हवा. धुरी हे करत आहेत.