इसवली येथील ग्रामस्थ उमेश कदम २ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे करणार उपोषण 

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील इसवली मठाचा पर्ऱ्या ते सतीचा उंबर या नव्याने झालेल्या व निकृष्ट दर्जाच्या रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाची सखोल चौकशी व्हावी तसेच संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी या मागणीसाठी इसवली येथील ग्रामस्थ उमेश कदम हे दिनांक २ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवाराबाहेर उपोषण करणार आहेत.

याबाबतचे निवेदन उमेश कदम यांनी जिल्हाधिकारी तसेच जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, इसवली पनोरे ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील इसवली मठाचा पर्ऱ्या ते सतीचा उंबर या रस्त्याची दुरावस्था झाल्याने रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामाला मान्यता मिळाली होती

‌त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होवून ते पूर्ण झाले आहे. काम झाल्यानंतर अवघ्या दिड ते दोन महिन्यातच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे झालेले मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम हे योग्य पद्धतीने झालेले नसल्याचे उमेश कदम यांचे म्हणणे आहे. पूर्वीचा जो डांबरी रस्ता होता त्याच्या वरतीच डांबर टाकून डांबरीकरण करण्यात आले असल्याचा आरोप देखील उमेश कदम यांनी केला आहे.

त्यामुळे सदर रस्त्याची आपल्या कार्यालयाकडून तपासणी करण्यात यावी तसेच प्रत्यक्ष अर्जदारांना सोबत घेऊन रस्त्याची लांबी रुंदी मोजण्या यावी अशी मागणी देखील उमेश कदम यांनी या निवेदनात केली आहे.

या कामासाठी निविदा रक्कम १२ लाख २५ हजार ३९९ असून सदरचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून कामासाठी वापरलेले साहित्य तसेच कामाची पद्धत ठरलेल्या अंदाजपत्रकापासून नुसार झालेली नाही त्यामुळे या कामाची टिकाऊ होणेबाबत शंका उद्भवते. तसेच झालेल्या कामाच्या ठिकाणी कामाचा फलक देखील लावण्यात आलेला नाही, असे उमेश कदम यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच निकृष्ट झालेल्या कामाबाबत दिनांक ११ जुलै २०२५ रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग रत्नागिरी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आलेली आहे. सदरचे काम हे तीन ते चार महिन्यांपूर्वी जि प बांधकाम उपविभाग लांजा यांच्या माध्यमातून झालेले आहे. या रस्त्यावर दररोज एसटीच्या सहा ते सात फेऱ्या आहेत. शाळेतील विद्यार्थी, नोकरदार, सामान्य नागरिकांना या निकृष्ट कामाचा सामना करावा लागत आहे, असे देखील ग्रामस्थ उमेश कदम यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि प रत्नागिरी यांना सादर केलेला निवेदनात म्हटले आहे .

या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असल्याने रस्त्याचे सब कॉन्ट्रॅक्टर यांची देखील सखोल चौकशी करण्यात यावी. या संपूर्ण कामाची सखोल चौकशी होऊन दोशींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली असून त्याच मागणीसाठी उमेश कदम यांनी दिनांक २ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवाराबाहेर उपोषण छेडले आहे.