मुलाला नवजीवन देण्यासाठी आई करणार ‘ किडनी ‘ दान

झोळंबेतील युवकाला आर्थिक मदतीची गरज 

सावंतवाडी । प्रतिनिधी : आपल्या एकुलत्या एक मुलाला नवजीवन देण्यासाठी एक आई आपली किडनी देण्यास तयार झाली आहे. पण नियतीने या कुटुंबाच्यासमोर आर्थिक संकटाची भिंत उभी केली आहे. दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे येथील सुनेश उदय गवस ३२ वर्षीय युवकाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असून, त्यांना तातडीने किडनी ट्रान्सप्लांटची गरज आहे. मात्र १२ ते १४ लाख रुपयांचा खर्च या गरीब कुटुंबासाठी डोंगराएवढा मोठा आहे. त्यामुळे त्यांच्यासमोरील हे आर्थिक संकट दूर करण्यासाठी त्यांना समाजातील दानशूरांकडून मदतीची गरज आहे.

सुनेश आपल्या पत्नी, तीन वर्षाची मुलगी आणि आईसोबत राहतात. वडिलांचे अकाली निधन झाल्यानंतर कुटुंबाचा संपूर्ण भार सुनेश यांच्या खांद्यावर होता. गोव्यातील एका कंपनीत काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. पण पाच महिन्यांपूर्वी अचानक त्यांना अशक्तपणा जाणवू लागला. तपासणी केली असता, दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले आणि हे कुटुंब अक्षरशः कोलमडून पडले.

आज सुनेश डायलिसिसवर आहेत. त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांची आई उर्मिला गवस यांनी आपला जीव पणाला लावायचं ठरवलं आहे. कोणत्याही मातेला आपल्या मुलासाठी काहीही कमी पडू द्यायचं नसतं. ‘आई’ हे दोन अक्षरी नावच प्रेमाचं आणि त्यागाचं प्रतीक आहे. त्यांच्यासाठी आपला देहही कमीच आहे. याच प्रेमापोटी त्यांनी आपली किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, शस्त्रक्रियेचा मोठा खर्च त्यांच्यासमोर आव्हान म्हणून उभा आहे.

एक आधार, एक आशेचा किरण:

या कुटुंबाकडे ना जमीन आहे ना शेती. जे काही होतं, ते सुनेशच्या उपचारावर खर्च झालं. आता त्यांच्याकडे मदतीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. एका बाजूला जीवन-मरणाचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला पैशाची चिंता. ही परिस्थिती कोणत्याही संवेदनशील माणसाला हेलावून टाकेल. सुनेशच्या चेहऱ्यावरील हरवलेलं हसू परत आणण्यासाठी, त्याच्या चिमुकल्या मुलीच्या डोळ्यांतील निरागसता जपण्यासाठी आणि त्याच्या आईच्या त्यागाला सार्थक करण्यासाठी समाजाच्या मदतीची गरज आहे.

आपल्या छोट्याशा मदतीने आपण एका कुटुंबाचा आधार वाचवू शकतो. एकीकडे आईने दिलेला जीवनदानाचा निर्णय आणि दुसरीकडे समाजाने दिलेली मदतीची हाक, यातूनच सुनेशला नवसंजीवनी मिळू शकते. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

मदतीसाठी तपशील:

सुनेश उदय गवस

खाते क्रमांक: १४६५१०५१००००६६३

बँक: बँक ऑफ इंडिया, शाखा बांदा

IFSC कोड: BKID०००१४१०

Google Pay / UPI:

९४०५१५२२७५

suneshgawas1953@okicici

अधिक माहितीसाठी रवींद्र गवस यांच्या ९४२०९५०७३३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन देखील गवस कुटुंबीयांनी केले आहे.