श्राद्ध म्हणजे पितरांना सद्गती मिळावी, ते संतुष्ट व्हावेत यासाठी श्रद्धायुक्त केलेला विधी- सुरेश शिंदे

 हिंदू जनजागृती समिती पंधरागाव धामणंद विभागात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने” पितृपक्ष-श्राद्धविधी” विषयावर प्रवचन

चिपळूण (प्रतिनिधी) : श्राद्धविधी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून त्याला वेदकाळाचा आधार आहे. पितरांना सद्गती मिळण्यासाठी पितृपक्षांमध्येही श्राद्धविधी करणे महत्त्वाचे आहे. पितृपक्षात एक दिवस श्राद्ध केले तर पितर वर्षभर तृप्त राहतात. व्यक्तीला पितृपणातून मुक्ती मिळायला सहाय्य होते. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हवीर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. अतृप्त पूर्वजांमुळे कुटुंबात पितृदोष निर्माण होतात. पितृदोषामुळे कुटुंबाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. श्राद्धादी विधी केल्याने कुटुंबातील पितृदोष दूर होतो. व्यक्तीचा, कुटुंबाचा अभ्युदय होतो. श्राद्ध म्हणजे पितरांना सद्गती मिळावी, ते संतुष्ट व्हावेत यासाठी श्रद्धायुक्त केलेला विधी होय, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे सुरेश शिंदे यांनी केले.
चोरवणे उतेकर, गावठाण येथील श्री राम वरदायिनी मंदिरात आयोजित केलेल्या पितृपक्ष आणि श्राद्धविधी या विषयावरील प्रवचनात ते बोलत होते. या प्रवचनाचा लाभ गावातील बहुसंख्य जिज्ञासूंनी घेतला. प्रवचनाचे नियोजन ग्रामस्थ विजय जाधव, अनिल उत्तेकर, शिवाजी उतेकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. शिंदे पुढे म्हणाले की, काही कारणास्तव शास्त्रोक्त श्राद्धविधी करणे शक्य न झाल्यास आमान्न श्राद्ध, हिरण्यश्राद्ध, गोग्रास देणे असेही पर्याय हिंदू धर्मात दिलेले आहेत. थोडक्यात कोणाही व्यक्तीला श्राद्ध विधी करता आला नाही असे होऊ नये इतका सूक्ष्म विचार हिंदू धर्मात केलेला आहे. या कालावधीत श्री गुरुदेव दत्त हा नामजपही अधिकाधिक करावा. दत्ताच्या नामाच्यामुळे मृत्यूलोकात अडकलेल्या पूर्वजांना गती मिळते. त्यामुळे पुढे ते त्यांच्या कर्मानुसार पुढच्या पुढच्या लोकात गेल्याने पितृदोष कमी होतो. दत्ताच्या नामजपमधून निर्माण होणाऱ्या शक्तीमुळे नामजप करणाऱ्याच्या भोवती संरक्षक कवचही निर्माण होते. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने १० सप्टेंबर या दिवशी धामणंद विभागात ४ गावात पितृपक्ष या विषयावर प्रवचने झाली.
यावेळी सेवेत समितीचे महेंद्र साळुंखे आणि कळंबस्ते येथील धर्मप्रेमी जगन्नाथ मोरे सहभागी झाले होते. या प्रवचनांना उत्तम प्रतिसाद मिळाला. धामणंद-गावठाण येथील श्री मारुती मंदिर येथे विष्णू कदम, बबन सुतार यांनी तसेच साखर ब्राह्मणवाडीतील समाज मंदिरात गणेश उतेकर यांनी नियोजन केले. चोरवणे गडकरवाडी येथे हभप प्रकाश शिंदे यांनी ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल शिंदे यांच्या सहकार्याने स्वतःच्या घरी प्रवचनाचे आयोजन केले. या प्रवचनांच्या वेळी कोणत्या तिथीला श्राद्ध करावे तसेच जिज्ञासूंच्या अन्य शंकांचे निरसन करण्यात आले. झालेल्या या प्रवचनांच्या गावांतून नवरात्रोत्सवातही प्रवचनाची मागणी करण्यात आली आहे.