काकड आरतीने झाली हरिनाम सप्ताहाची सांगता
पौराणिक चित्र देखावा व पौराणिक पात्रांनी जिंकली उपस्थितांची मने
शिरगाव (प्रतिनिधी) “विठ्ठल! विठ्ठल!” च्या अखंड जयघोषात, टाळ-मृदंगांच्या निनादात आणि ढोल-ताशांच्या गजरात साळशी गाव हरिनामाच्या भक्तिरसात रंगून गेले. सात दिवस चाललेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता गुरुवार, दि. १८ सप्टेंबर रोजी पहाटे काकड आरतीने झाली.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व चौ-याऐंशी खेड्यांचा अधिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगड तालुक्यातील साळशी येथील इनामदार श्री पावणाई देवी मंदिरात हा सप्ताह ११ ते १७ सप्टेंबर या कालावधीत संपन्न झाला.
या हरिनाम सप्ताहात साळशी गावकरवाडी, देवणेवाडी, घाडीवाडी, अंगणवाडी येथील चिमुकल्यांनी संयुक्तिक बालदिंडी काढली. बोबड्या बोलणाऱ्या मुलांच्या गोड हरिनामामुळे सप्ताहाचे वातावरण अधिकच पवित्र आणि रंगतदार झाले.
किंजवडे परबवाडी येथील श्री पावणाई देवी भजन मंडळाने दिंडी भजनात पौराणिक पात्रांची रंगीत वेशभूषा सादर केली आणि उपस्थितांची वाहवा मिळवली.
हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या रात्री श्री संत सिद्धेश्वर पावणाई प्रासादिक भजन मंडळाने ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत व विठ्ठल नामाच्या जयघोषात रंगीत दिंडी काढली. या रंगीत दिंडीत हयग्रीव राक्षसाचा वध’ हा पारंपरिक पौराणिक चित्र देखाव्याचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये श्रीविष्णू – शैलीप साळसकर, श्री देवी पराशक्ती – ईतिशा घाडी, हयग्रीव राक्षस – गणेश मिराशी यांनी वेशभूषा साकारल्या. तसेच प्रवीण नाडणकर, सुहास कोदे, प्रकाश कींजवडेकर, राजेंद्र घाडी यांनी आकर्षक वेशभूषा परिधान करून रसिकांचे मनोरंजन केले.
या सात दिवस चाललेल्या हरिनाम सप्ताहात तब्बल २५ दिंड्यांनी सहभाग नोंदवला. शिरगाव, वरेरी, मठबुद्रुक, कासार्डे, भरणी, चाफेड, निरोम, कणकवली, आरे, कुवळे, कट्टा, आयनल, हळवळ, किंजवडे, खुडी, तोरसोळे, कोळोशी, ओंबळ अशा अनेक गावांतील दिंड्या भक्तिभावाने सहभागी झाल्या.
संपूर्ण सप्ताहाच्या काळात सहभागी झालेल्या सर्व भजनी मंडळींना श्री देव सिद्धेश्वर पावणाई इनाम देवस्थान ट्रस्टतर्फे, बारा पाच मानकरी व साळशी ग्रामस्थांच्या वतीने सन्मानपूर्वक आभार मानले गेले. तसेच सर्वांसाठी चहा, लाडू आणि महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.
या हरिनाम सप्ताहात ग्रामस्थांची, पंचक्राशीतील भक्तगणांची, चाकरमान्यांची आणि माहेरवाशीयांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती, आणि साळशी गाव विठ्ठल नामाच्या भक्तिरसात उजळून निघाले.













