लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयात ‘हिंदी दिन’ साजरा

मंडणगड (प्रतिनिधी) : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने नुकताच ‘हिंदी दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून हिंदी विभागाध्यक्ष डॉ. अशोक साळुंखे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. दगडू जगताप यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करुन कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. डॉ. अशोक साळुंखे यांनी सांगितले की, हिंदी भाषेला समृध्द असे साहित्य-भांडार लाभले असून विश्व-साहित्यामध्ये आपला वेगळा ठसा उमटविला आहे. प्रेमचंद यांची ‘गोदान’ ही कादंबरी केवळ हिंदीचीच नव्हे तर जगातील दहा सर्वश्रेश्ठ कादंबऱ्यांमध्ये तिचा समावेश होतो. अगदी स्वातंत्र्य प्राप्तीच्या आधीपासूनच हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असून आज तिला राजभाषेचा सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा व राजभाषा असून रोजच्या व्यवहारात तिचा वापर केला पाहिजे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये यांनी हिंदी दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, हिंदी ही केवळ एक भाषा नसून अनेक भाषांचा समूह आहे. इंग्रजीमध्ये केवळ दहा हजार मूळ शब्द आहेत. परंतु हिंदीमध्ये अडीच लाख मूळ शब्द आहेत. सुमारे पंचवीस करोड लोग हिंदी भाषा बोलतात. जगभरामध्ये सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये हिंदीचा तिसरा क्रमांक लागतो. हिंदी साहित्याचा इतिहास एक हजार वर्षांपूर्वीचा आहे. यावेळी उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘हिंदी भाषा: व्यावहारिक प्रयोग’ या विषयावरील भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिंनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी आंबेकर हिने तर आभार कु. सुहानी दुर्गवले हिने मानले.