राजापूर नगर परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रभाग क्र. १० बाबतच्या हरकती मान्य दिवडेवाडीचा काही भाग व बाग काझी मोहल्ल्याचा प्रभाग क्र. ९ नऊ मध्ये समावेश ८३ पैकी ७३ हरकती मान्य १० हरकती फेटाळल्या

राजापूर (प्रतिनिधी): राजापूर नगर परिषदेच्या प्रभाग रचनेतील प्रभाग क्र. १० बाबत दाखल करण्यात आलेल्या हरकती मान्य करण्यात आल्याचे मंगळवारी अंतिम जाहिर झालेल्या प्रभाग रचनेतुन पुढे आले आहे. नवीन व अंतिम प्रभाग रचनेत दिवटेवाडीतील काही भाग व बाग काझी मोहल्ला हा भाग प्रभाग क्र. ९ मध्ये समाविष्ठ करण्यात आला आहे.
याबाबत दाखल करण्यात आलेल्या एकूण ८३ हरकतीं पैकी ७३ हरकती प्रशासनाकडून मान्य करण्यात आल्या असून उर्वरित १० हरकती फेटाळण्यात आल्या आहेत.
राजापूर नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द झाल्यानंतर प्रशासनाकडून त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रभाग क्रमांक दहा बाबत सर्वाधिक हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. प्रभाग क्रमांक दहा मधील दिवटेवाडीतील काही भाग व बाग काझी मोहल्ला हा भाग प्रभाग क्रमांक दहा मध्ये जोडण्यात आला होता. त्यावर या हरकती होत्या. याबाबत माजी आमदार एड. सौ. हुस्नबानू खलिफे यांसह सुबोध पवार व दिवटेवाडी येथील नागरिकांनी हरकती दाखल केल्या होत्या. दिवटेवाडीचे प्रभाग क्र.०८,०९ व १० अशा तीन प्रभागात विभाजन करण्यात आले असून दिवटेवाडी ही वाडी भौगोलिकदृष्ट्या तसेच लोकसंख्येनुसार मोठीवाडी असली तरी सदर वाडीचे विभाजन हे किमान प्रभागात होणे आवश्यक आहे. असे असताना सदर वाडीचे विभाजन हे कमाल प्रभागात करण्यात आलेले आहे. दिवटेवाडी व प्रभाग क्र.१० यामध्ये अर्जुना नदी असून या वाडीपासून प्रभाग क्र.१० मधील मतदान केंद्र अडीच ते तीन किलोमीटर लांब आहे. या बाबींकडे प्रशासनाचे या हरकतीद्वारे लक्ष वेधताना प्रारूप प्रभाग रचनेनुसार प्रभाग-१० मध्ये समावेश करण्यात आलेला दिवटेवाडीचा भाग प्रभाग-९ मध्ये समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी हरकतीद्वारे करण्यात आली होती. यावर सुनावणी झाली होती. मात्र अंतिम निर्णय काय झाला हे अंतिमह प्रभाग रचना जाहिर झाल्यावरच कळणार होते. मंगळवारी राजापूर नगर परिषदेची अंतिम प्रभाग रचना प्रशासनाकडून जाहिर करण्यात आली आहे.
यामध्ये हरकतीमध्ये उपस्थित करण्यात आलेले मुद्दे प्रशासनाने मान्य केल्याचे पुढे आले आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक दहा मध्ये समाविष्ठ करण्यात आलेला दिवटेवाडीतील काही भाग व बाग काझी मोहल्या हा भाग वगळयात आला असून त्याचा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये समावेश करण्यात आला आहे. राजापूर नगर परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेविरोधात दाखल झालेल्या ८३ हरकतीपैकी ७३ हरकती मान्य करण्यात आला असून दहा हरकती फेटाळण्यात आल्या आहेत.
अंतिम मंजूरीने नव्याने झालेली नऊ व दहाची प्रभाग रचना
अंतिम प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये उत्तरभागात रानतळे रस्ता, शिंदे टाकीपर्यंत, पुढे ढवळेघर, दिवटेवाडी रस्ता, सागवेकर वहाळीपर्यंत, दुदम पायवाट, पुढे गुजराळी वहाळी, जैतापूर खाडीपर्यंतचा भाग, पुर्वेकडे गुजराळी वहाळीपासून जैतापूर खाडीचा भाग, पुढे नगर परिषद हद्दीपर्यंत, दक्षिणेकडे जैतापूर खाडीपासून काही भाग धोपेश्वर गाव सुरू होतो त्या सिमेपर्यंत, पश्चिमेकडे मौजे धोपेश्वर गावचे हद्दीपासून रानतळे रस्त्याचा भाग
तर प्रभाग क्रमांक दहा मध्ये उत्तरेकडे पेडणकर टाकीपासून पुढे अर्जुना नदीचा भाग, मौजे कोंढये गावच्या सिमेपर्यंत, पुर्वेकडे कोंढये गावच्या सिमेपासून ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चा भाग, दक्षिणेकडे राष्ट्रीय महामार्ग ६६ पासून डोंगर गावाकडे जाणारा मार्ग धोपटेवाडीपर्यंत. पश्चिमेकडे धोपटेवाडीपासून ते पुढे अभ्यंकर पार पर्यंतचा भाग जैतापूर खाडीपर्यंत.