पद्मश्री डॉ. के. एच. घरडा यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय, लवेल येथे एम.एम.एस. विभागाच्या वतीने पद्मश्री डॉ. के. एच. घरडा यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त २५ सप्टेंबर २०२५ रोजी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २५ सप्टेंबर या जन्मतिथीपासून ते ३० सप्टेंबर या प्रथम स्मृतिदिनापर्यंत महाविद्यालयात घरडा साहेबांच्या कार्यावर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता व सर्जनशीलता वापरून घरडा सरांचे जीवनकार्य, त्यांचे वैज्ञानिक योगदान तसेच समाजाभिमुख कार्य पोस्टरच्या माध्यमातून साकारले. प्रत्येक पोस्टरमधून विद्यार्थ्यांमध्ये दडलेली ऊर्जा आणि घरडा सरांनी दिलेली प्रेरणा ठळकपणे दिसून आली. या स्पर्धेत एम.एम.एस. विभागातील आदित्य अ. गमरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक केमिकल विभागातील विराज वि. कदम यांना मिळाला, तर तृतीय क्रमांक एम.एम.एस. विभागातील स्नेहा जी. देसाई आणि खुशी कि. विचारे यांनी पटकावला.
या कार्यक्रमाला घरडा केमिकल्स लिमिटेड, लोटे येथील एच. आर. जाधव आणि फायर अँड सेफ्टी विभागाचे महाडिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी घरडा केमिकल्सच्या कृषी क्षेत्रातील योगदानाची माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडत त्यांना प्रेरणा दिली. प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी स्वागताध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. घरडा यांचे विज्ञान, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य अधोरेखित केले. “विद्यार्थ्यांनी घरडा सरांचा आदर्श घेऊन आपले भविष्य घडवावे,” असे त्यांनी सांगितले. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. कळंबकर (मेकॅनिकल विभाग) व जी.सी.एल. फायर अँड सेफ्टी विभागाचे महाडिक यांनी केले. विशेष उपस्थितीत उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, विभागप्रमुख डॉ. सातपुते (ASH), डॉ. कुलकर्णी (केमिकल अभियांत्रिकी), शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. नितीन कोळेकर, अधिष्ठाता (IIC) डॉ. समीर गजमल, डॉ. डोके (केमिकल विभाग), प्रा. मंगेश ठसाळे (एम.सी.ए.), प्रा. सौ. सायली घाडगे (एम.सी.ए.) आणि प्रा. करिश्मा कवळे (एम.एम.एस.) आदी मान्यवर उपस्थित होते.
ही स्पर्धा एम.एम.एस. विभागप्रमुख प्रा. पी. आर. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहा. प्रा. श्रृंगी तेली यांनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, टीमवर्क, कलात्मकता आणि समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याची प्रेरणा जागृत झाली.