मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाम. नितेश राणे व आम. निलेश राणे यांच्यासह २२ जणांची निर्दोष मुक्तता

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत कायदा मोडल्याचा आरोप फेटाळला

अॅड राजेश परुळेकर, अॅड ओंकार परुळेकर यांनी न्यायालयात मांडली बाजू

कणकवली – भारतीय जनता पक्षाच्या जन आशीर्वाद यात्रेप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात पालकमंत्री नामदार नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्यासह २२ जणांची कणकवली न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

२७ ऑगस्ट २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची जन आशीर्वाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कलम ३७ (१)(३) नुसार २४ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत मनाई आदेश लागू केला होता. त्यानंतर कणकवली पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सीआरपीसी १४९ नोटीस बजावली होती.

मात्र या काळात कणकवलीसह खारेपाटण, तरळे, फोंडाघाट, पटवर्धन चौक, शिवाजी चौक, नरडवे नाका आदी ठिकाणी बेकायदा जमाव करून सभा व मिरवणुकीचे आयोजन केले. यावेळी “नारायण राणे अंगार है बाकी सब भंगार है” व “आता कसं वाटतंय गार गार वाटतंय” अशा घोषणा देत मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक अनमोल राणे यांनी कणकवली पोलिसात दिली होती.

या फिर्यादीवरून पोलिसांनी भादंवि कलम १४३ व पोलीस अधिनियम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. मात्र, पुराव्याअभावी आज दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी मेहेरबान न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्या वतीने अॅड. राजेश परुळेकर, अॅड ओंकार परुळेकर यांनी काम पाहिले.